सातारा :
ठोसेघर धबधब्याकडे जाणाऱ्या बोरणे घाटात मंगळवारी सकाळच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे ठोसेघर बाजूकडून साताऱ्याकडे येणाऱ्यांची चांगलीच गैरसोय झाली. रस्त्यात दगड आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास देताच केवळ दोन तासात बाहतूक सुरळीत करण्यात आली. सातारा बांधकामचे अभियंता प्रशांत खैरमोडे यांनी ही कार्यवाही केल्याने ठोसेघरसह सातारा परिसरातील नागरिकांनी सातारा बांधकामच्या कामाबाबत धन्यवाद मानले.
सातारा तालुक्यातील सज्जनगड, ठोसेघर या महत्वाच्या ठिकाणाला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला बोरणे घाट आहे. त्या घाटात सकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर दगड आले. ते रस्त्यात मध्येच आल्याने ठोसेघर, चाळकेवाडी, चिखली, मानेवाडी या गावाकडे गेलेली मुक्कामी वाहने व सकाळी साताऱ्याकडे नोकरी, शिक्षण कामानिमित्ताने येणारे ग्रामस्थ यामुळे अडकले. वाटेतच भला मोठा दगड आला होता. त्याची माहिती स्थानिकांनी अगोदर या भागातील नेत्यांना फोनवरुन दिली. त्याबाबतचे फोटोही पाठवले. त्यातील काही नागरिकांनी त्याची माहिती पत्रकारांना दिली.








