चिपळूण :
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढत चालला असून सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यालगतची दरड ढासळल्याने काँक्रिटीकरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कुंभार्ली घाटातही माती रस्त्यालगत आली असून वाहतूक सुरळीत आहे. पावसात कोठेही नुकसान झाले नसून वाशिष्ठी व शिवनदीची पाणीपातळी स्थिर आहे.
सध्या तालुक्यात सर्वत्रच जोरदार पाऊस कोसळत असतानाच परशुराम घाटात चौपदरीकरणात पेढे गावच्या बाजूला असलेल्या मार्गिकवरील काँक्रिटीकरणालगतची दरड सोमवारी अधिक ढासळली आहे. यापूर्वी या घाटात संरक्षण भिंतीचे तीनतेरा वाजले असतानाच आता या कोसळलेल्या दरडीमुळे काँक्रिटीकरणाला धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत येथील वाहतूक सुरळीत आहे. तर दुसरीकडे कुंभार्ली घाटातही एका ठिकाणी दरड कोसळून रस्त्यालगत आली आहे. मात्र रस्त्याच्या बाजूला असल्याने अद्याप वाहतुकीला कोणताही धोका नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या पावसामुळे तालुक्यात कोठेही नुकसान झालेले नाही. तसेच शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीची पाणीपातळीही स्थिर असल्याचे दिसून येत आहे.
- १६९७ मि. मी. पाऊस
सोमवारी तालुक्यात २२.४४ मि. मी., तर आतापर्यंत १६९७ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद तहसील कार्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षात झाली आहे








