वृत्तसंस्था/ पिथौरागढ
उत्तराखंडचा सीमावर्ती जिल्हा पिथौरागढच्या धारचुला भागात मोठी भूस्खलन झाली असून त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. तवाघाट परिसरात दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली. भूस्खलनानंतर उठलेले धुळीचे लोट व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून स्थानिक प्रशासनाने लोकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.
दरड कोसळण्याची घटना शुक्रवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. तवाघाट परिसरात राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू असताना अचानक डोंगराच्या मोठ्या भागाला तडे गेल्याचे सांगण्यात येत आहे. काही सेकंदात संपूर्ण डोंगराला तडे गेले आणि आजूबाजूला धुळीचे लोट पसरल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आता बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) महामार्ग खुला करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अद्याप मार्ग खुला झालेला नाही. रस्ता खुला होण्यास वेळ लागू शकतो, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या तवाघाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अशा घटना अधूनमधून घडत असतात.









