डोंगरमाथ्यावरील दुकानांवर मध्यरात्री कोसळले दगड
वृत्तसंस्था/ रुद्रप्रयाग
उत्तराखंडमधील अनेक जिह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वातावरणात गुरुवारी रात्री उशिरा रुद्रप्रयाग येथील गौरीकुंडजवळ बांधलेल्या दुकान टपऱ्यांवर भूस्खलनानंतर दरड कोसळली. कोसळला. मोठ्या प्रमाणात ढिगारा पडल्याने दोन दुकानांचे नुकसान झाले. रात्रीच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले होते, मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्य नीट होऊ शकले नाही. शुक्रवारी सकाळी पुन्हा बचाव व मदत पथक घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत 13 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 7 लोक मूळचे नेपाळचे तर उर्वरित इतर राज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व लोक तिथे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी लोक दुकानात झोपले होते, असे सांगण्यात येत आहे.
संततधार पावसामुळे डोंगराला तडे जात असल्याने केदारनाथ यात्रेवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. या अपघातानंतर केदारनाथला जाणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर प्रवाशांना केदारनाथ धामला जाण्याची परवानगी दिली जाईल.









