मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोर्तुगीजांच्या खुणा मिटवायची भाषा केली आणि वादळ उठले. मुख्यमंत्र्यांना हिंदुना गोंजारायचे होते, यात शंका नसली तरी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवून या विषयाला काहींनी अवास्तव महत्त्वही दिले. हा वाद शमलाच नाही तोच रूमडामळ भागात बेकायदा मदरशाच्या प्रश्नावरून पंचसदस्यावर हल्ला झाला आणि दुसरा वाद उफाळून आला. देव करो आणि ही भविष्यातील नांदी न ठरो. तिसरा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे नोंद झाला. एका दिवसांत शमलेला हा वाद बरेच काही सांगून गेला. तरी बरे या वादांनी काट्याचा नायटा केला नाही…..
आपल्या गोव्यात अधूनमधून कसले ना कसले तरी वाद उफाळून येत असतात. हे वाद थोडक्यात मिटतात, हे आपले सुदैव. धर्म, भाषा, राष्ट्रीयत्व, प्रांतीय वाद अशा मुद्द्यांवरून कधी कधी काहूर माजतेच. हल्ली या वादांमध्ये बरीच वाढ झाल्याचे दिसून येते. शांत गोवा कधीकाळी इतरांपासून फारच वेगळा होता. आता तो बऱ्याच बाबतीत राष्ट्रीय प्रवाहात सामील झालेला आहे. वेगळेपण हरवत चाललेला आहे. शांततेला गालबोट लागू लागले आहे. ते विरुध्द आम्ही अशा प्रकारची संस्कृती गोव्यातही रुजत आहे. गोव्याचे सामाजिक स्वरुप आता बदलत आहे. अनेक वाईट गोष्टींनी गोव्यात जन्म घेतलेला आहे. त्यावर कुणाचेही ठोस नियंत्रण नाही. सरकारचे लक्ष समाजकारणापेक्षा राजकारणाकडे अधिक असते. त्यामुळे धुमसणारे प्रश्न सहसा सुटत नाहीत. ते वाढतच जातात. किंबहुना राजकारणामुळे नवनवीन प्रश्न निर्माण होतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुख्यमंत्र्यांनी हल्लीच गोमंतकीयांना गुलामगिरीची आठवण करून दिली आणि वाद निर्माण केला. गुलामगिरीची आठवण करून देणाऱ्या गोव्यातील पोर्तुगीजांच्या खुणा हाही तसा धुमसणाराच प्रश्न. साडेचारशे वर्षे राज्य करून पोर्तुगीज गोवा सोडून गेल्यास बासष्ठ वर्षे झाली तरी त्या खुणा पुसण्याचे धैर्य आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना झालेले नाही. ज्यांच्या रक्तात राष्ट्रवाद भिनलेला आहे, त्यांना गुलामगिरीच्या खुणा सहन होत नाहीत. आपल्याच वर्तमान आणि भविष्याच्या चिंतेत राहणाऱ्या जनतेला गुलामगिरीच्या खुणांचे गांभीर्य वाटत नाही. जे लोक अद्याप मानसिक गुलामगिरीतच जगण्यात धन्यता मानतात, त्यांच्यासाठी गुलामगिरीच्या खुणा हा प्रश्नच नाही. या खुणांविरुद्ध जर कोणी काही बोलले तर ते काहूर माजवतात, हे खरेच आहे.
मुख्यमंत्र्यांना आत्ताच गुलामगिरीच्या खुणा कशा आठवल्या, असा प्रश्न सामान्यांना पडू शकतो. पोर्तुगीज गुलामगिरीच्या खुणा म्हणजे पाव, मिर्ची, फळे, भाज्या, रेल्वे, बंदर, विमानतळ गोमंतकीय जनतेला निश्चितच अभिप्रेत नाही आणि मुख्यमंत्र्यांनाही त्या अभिप्रेत नसाव्यात. राष्ट्रवादी जनतेला खुपतात ती, गोव्यातील शहरांची आणि गावांची नावे. पोर्तुगीजांची नावे स्वतंत्र गोव्यात गुलामगिरीची प्रतिके बनून मिरवतात, हे त्यांना पटत नाही. याच खुणा मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असाव्यात. साडेचारशे वर्षांच्या काळात पोर्तुगीजांनी गोव्याला किती लुटले आणि सांस्कृतिकदृष्ट्या किती आणि कसे उद्ध्वस्त केले, हा स्वतंत्र विषय आहे. तरीही गोमंतकीय पोर्तुगीजांबद्दल कधी खुन्नस व्यक्त करीत नाहीत. उलट काही लोकांना पोर्तुगीजांबद्दल वाईट बोललेलेही आवडत नाही. त्यांना गुलामगिरीच्या खुणा मिटाव्यात, असे वाटतच नाही. गोव्याला अशा परंपरेचा वारसा लाभलेला असताना मुख्यमंत्र्यांनी खुणा मिटविण्याचे विधान केले परंतु खरेच मुख्यमंत्र्यांना खुणा मिटवायच्या आहेत की, भाजपपासून दुरावलेल्या हक्काच्या मतदारांना जोडण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला आहे, असा संशय उपस्थित होतो. गोव्यात भाजपने आतापर्यंत पंधरा वर्षांहून अधिक काळ राज्य केलेले आहे. राष्ट्रवादी विचारसरणीचा भाजप, त्यांची बहुमतातील सरकारे येऊनसुद्धा आतापर्यंत गोमंतकीयांना खटकणारी एकही खूण मिटवू शकले नाहीत. मनोहर पर्रीकरांनाही ते जमले नाही तर मुख्यमंत्री सावंतांनी हे वक्तव्य करण्याचे धाडस का व कशाच्या जोरावर केले. गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रवादाची वाटच लागलेली आहे, असे राष्ट्रवादी जनता मानते. त्यामुळे सरकारकडून खुणा मिटविण्याचा प्रयत्न होईल, असा गैरसमज जनता करून घेणार नाही.
गोव्याचे मुख्यमंत्री हल्ली हिंदू धर्म, मंदिरे, संस्कृती इत्यादी गोष्टींवर चांगली वक्तव्ये करतात, घोषणा करतात यामागे राजकारणापलीकडे काहीच नाही हे जनतेलाही कळते.
मुख्यमंत्र्यांनी खुणा मिटविण्यावरून निर्माण केलेले वादळ ओसरेपर्यंत तिकडे रूमडामळ पंचायत क्षेत्रातील मदरशावरून पंच विनायक वळवईकर यांच्यावरच हल्ला झाल्याने धार्मिक वाद उफाळून आला. मदरसा जर बेकायदा असेल व त्याचा लोकांना त्रास होत असेल तर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, यात वाद नाही मात्र सारी वस्तीच जर बेकायदेशीर असेल तर एक मदरसा कायदेशीर असणे अवघडच आहे. अनियंत्रित वस्त्यांमधून अनियंत्रित कृत्ये विविध मार्गाने घडतच असतात. नावेलीतील रूमडामळ दवर्ली भागात धार्मिक तणावाचे प्रसंग अधूनमधून उद्भवत असतात. अशाच संवेदनशील वस्त्या गोव्यातील अन्य भागातही आहेत. पुढील काळात धार्मिक तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. राजकीय तडजोडीचा हा परीपाक आहे. एखाद्या बेकायदेशीर कृत्याबाबत बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्यास गैरप्रकाराविरुद्ध बोलण्याचे धाडस कुणी करणार नाही. गोव्याचे स्वरुप बदलू लागले आहे. राजकारण्यांनी आता तडजोडीचा मार्ग अवलंबिणे बंद करायला हवे, हेच खरे.
असाच धार्मिक तणाव कळंगुटमध्येही निर्माण झाला. तोसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज काहींना परकेच नव्हे तर शत्रुच वाटतात कारण त्यांनी गोवा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. मराठेविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन गोव्यात अधूनमधून होतच असते. कुणाचेही पुतळे चालतात मात्र छत्रपती शिवाजी किंवा संभाजी महाराजांचा पुतळा म्हणजे गोव्यावर जणू आक्रमणच वाटू लागते. हे सत्य असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे बेकायदा पुतळे कुठेच उभे राहता कामा नयेत, हे शिवप्रेमींनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे भावनिक विषय कसे हाताळावेत याचे भान पालिका किंवा पंचायतींनी ठेवायलाच हवे. पुतळ्यावरून किंवा धार्मिक स्थळांवरून गोव्यात वरचेवर वाद निर्माण होतात. त्यातून तणाव निर्माण होतात. गोवा बदलतो आहे, हे मान्य असले तरी तो कुठल्या वळणावर जात आहे, याची चिंता करायलाच हवी.
अनिलकुमार शिंदे








