मनसे माजी विभागीय अध्यक्ष मिलींद सावंत यांचे बांदा पोलीसांना निवेदन
प्रतिनिधी
बांदा
बांदा शहरात परप्रांतीय मजूरांची संख्या वाढती असून ते भाड्याने खोली घेऊन राहतात. रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरताना हे निदर्शनास येतात. परिसरात बंद घरे फोडून चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत पोलीस गस्त वाढवावी. तसेच घरमालकांना भाडेकरु ठेवताना भाडे करारनामा सक्तीचा करावा, अशी मागणी मनसे माजी विभागीय अध्यक्ष मिलींद सावंत यांनी बांदा पोलीसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत त्यांनी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. बांदा शहर व परिसरात बंद घरे फोडण्याच्या घटना वाढल्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात बांधकाम कामगार, भंगार गोळा करणारे मजूर तसेच किरकोळ कामे करणारे परप्रांतीय मजुरांची संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळी हे कामगार शहरात संशयास्पद फिरत असतात. आधारकार्डची मागणी केल्यास उद्धटपणे बोलतात व पळून जातात.
शहरात जे घरमालक भाड्याने खोली देतात त्यांना भाडे करारनामा सक्तीचा करा अशी आग्रही मागणी केली. यावेळी माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे, विजय बांदेकर, चिन्मय नाडकर्णी, जय पटेकर, प्रथमेश पडवळ, अमोल सावंत आणि तुषार देसाई उपस्थित होते.









