चिपळूण नगर परिषदेची कारवाई, व्यावसायिकांचे धाबे दणाणले
प्रतिनिधी/चिपळूण
शहरातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण नगर परिषदेने गुरूवारी जमीनदोस्त केले. यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
शहराच्या मध्यभागी भाजी मंडईची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र त्यातील शाॅपिंग सेंटरचे गाळे वगळता भाजी मंडईतील एकाही गाळ्याचा लिलाव झाला नसून अनेक अडचणींमुळे ते घेण्यास भाजी व्यावसायिक राजी नाहीत. त्यामुळे या प्रकल्पासाठी खर्च केलेले नगर परिषदेचे करोडो रूपये वाया गेले आहेत. असे असताना या मंडईच्या इमारतीला सर्वच बाजूंनी अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगर परिषद अधूनमधून या अतिक्रमणांवर कारवाई करते. मात्र काही दिवस गेल्यावर व्यावसायिक पुन्हा त्याच जागी येताना दिसतात.
गेल्या काही महिन्यांपासून येथील अतिक्रमणांत मोठी वाढ होताना दिसत होती, तर काही दिवसांपूर्वी एका महिलेने येथे चक्क छप्पर उभारले. त्यामुळे प्रशासनाने तिला ते काढून घेण्यास सांगितले. तरीही ती ऐकत नव्हती. त्यामुळे गुरूवारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेसीबी लावून मंडई परिसरातील सर्वच अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच व्यावसायिकांचे सर्व साहित्यही जप्त केले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : जिल्ह्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा