वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडिगोच्या दिल्ली-देहराडून विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिगोच्या विमानाने बुधवार, 21 जून रोजी दिल्लीहून उत्तराखंडमधील देहराडूनला उ•ाण केल्यानंतर बिघाडाचा संशय आल्यानंतर काही वेळाने विमान पुन्हा दिल्लीतच उतरवण्यात आले. विमानात बिघाडाचा संशय आल्यानंतर पायलटने प्रक्रियेनुसार नियंत्रण कक्षाला माहिती देत लँडिंगसाठी विनंती केली. त्यानंतर नियंत्रण कक्षातून मिळालेल्या सिग्नलनंतर विमान सुरक्षितणे उतरल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
इंडिगो विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी 10 जून रोजी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहे. याशिवाय 4 जून रोजी दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. याप्रसंगी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भाजपचे दोन आमदारही विमानात होते. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी बेंगळूर-वाराणसी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.









