साडेचार हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
खानापूर : येथील भूमापन कार्यालयातील भूमापन अधिकारी विनोद संबानी यांना साडेचार हजार रुपयाची लाच घेताना बेळगाव लोकायुक्तांनी मंगळवारी दुपारी चौराशी मंदिरनजीक रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्यावर लाचलुचपत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकायुक्तांच्यामार्फत पुढील चौकशी सुरु आहे. ही कारवाई लोकायुक्त जिल्हा पोलीस प्रमुख हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून उपअधीक्षक भरत एस. आर. यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. तसेच निरीक्षक आर. एस. धर्मट्टी, संगमनाथ होसमणी, राजश्री भोसले, गिरीश पाटील, अभिजीत जमखंडी, संतोष बेडग, बसवराज कोडली, प्रकाश माळी या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुटीन्होनगर येथील शेतकरी सदाशिव कांबळे यांची कांजळे येथे शेतजमीन आहे. सर्व्हेनंबर 119 या शेतीचा चकबंदी करुन पिटीशीट तयार करण्यासाठी सदाशिव कांबळे भूमापन कार्यालयात अर्ज केला होता. भूमापन अधिकारी विनोद संबानी या अधिकाऱ्याकडे हे काम सोपवण्यात आले होते.
या कामासाठी विनोद संबानी यांनी सदाशिव कांबळे यांच्याकडे पाच हजाराची लाच मागितली होती. गेल्या काही दिवसांपासून सतत कामासंदर्भात कांबळे यांनी भूमापन कार्यालयाच्या वारंवार विचारणा केली होती. मात्र विनोद संबानी यांनी पैसे दिल्याशिवाय काम होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सदाशिव कांबळे यांनी बेळगाव लोकायुक्ताकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन लोकायुक्तानी मंगळवारी सापळा रचला होता. सदाशिव कांबळे यांनी भूमापन अधिकारी विनोद संबानी यांच्याशी संपर्क साधून आपण पैसे देण्यास तयार असल्याचे सांगताच संबानी यांनी पारिश्वाड क्रॉस येथे येवून पैसे दे असे सांगितले. त्यानुसार कांबळे यांनी चौराशी मंदिरनजीक संबानी यांना बोलावून पैसे दिले. त्याचवेळी सापळा रचून थांबलेल्या लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. आणि त्यांना ताब्यात घेऊन भूमापन कार्यालयात आणण्यात आले. यानंतर सर्व कागदपत्रांची तसेच संबंधित बाबतची सखोल चौकशी करण्यात आली. भूमापन कार्यालयात ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.
शेतकऱ्यांची होतेय पिळवणूक
भूमापन कार्यालयातील भ्रष्टाचाऱ्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. तसेच अनेक गैरप्रकारही उघडकीस आलेले आहेत. हुळंद येथील जमिनीच्या मोजणी संदर्भातही भूमापन अधिकाऱ्यांनी केलेला गैरप्रकाराबाबत दोन अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. तरीही भूमापन कार्यालयातील कारभार सुधारलेला नाही. तसेच या कार्यालयात भ्रष्टाचाऱ्याचा कळस गाठला असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. कामे वेळेवर होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.









