प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील जमीन घोटाळ्य़ांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एक सदस्यीय चौकशी आयोगाचे प्रमुख, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्हि. के. जाधव गोव्यात दाखल झाले असून लवकरच ते चौकशीचे काम सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांना पाटो प्लाझा, पणजी येथील स्पेस इमारतीत कार्यालयीन जागा देण्यात आली आहे.
जमीन घोटाळ्य़ाच्या आलेल्या तक्रारी, त्यांचे एफआयआर, चौकशी अहवाल याचा संपूर्ण तपशील त्यांना सादर करण्यात येणार असून त्यानंतर ते आयोगामार्फत पुढील कार्यवाही करणार आहेत. घोटाळा प्रकरणातील सर्व प्रकारची कागदपत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात येणार असून त्यानंतर ते संबंधित तक्रारदार, आरोपींना पाचारण करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्य़ात जे कोणी दोषी आहेत त्यांचे पितळ उघडे करुन ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चोकशी आयोग प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.









