बस्तवाड ग्रामस्थांचे पीडीओंना निवेदन : ठरावानुसार जागेचे आरेखन
बेळगाव : बस्तवाड ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांतर्फे पीडीओ श्वेता यांना निवेदन देऊन कलावती मंदिरासाठी नियोजित मोजमाप करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जागेचे मोजमाप करून मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थ व भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बस्तवाड ग्राम पंचायत व्याप्तीत येणाऱ्या सर्व्हे क्रमांक 166 मधील गावठाण जमिनीतून कलावती मंदिरासाठी जागा मंजूर केल्याचा ठराव 2017 मध्ये करण्यात आला होता. मात्र जागा हस्तांतराची प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली होती. त्यामुळे कलावती आई भक्तांमधून मंदिर उभारण्यासाठी ग्राम पंचायतीकडे पाठपुरावा करण्यात आला होता. सदर जागेमध्ये रस्ता निर्माण करण्यात येत असल्याने मंदिराला जागा उपलब्ध होणार नसल्याचे संशय भक्तांमध्ये निर्माण झाला होता. त्यानुसार ठरावानुसार जागा मंजूर करण्याची मागणी करण्यात येत होती. याची दखल घेऊन ग्राम पंचायत सदस्य जोतिबा चौगुले, प्रेमा मरगाण्णाचे व ग्रामस्थांतर्फे पीडीओंना निवेदन देण्यात आले. याची दखल घेऊन पीडीओ श्वेता यांच्या उपस्थितीमध्ये गायरान जमिनीत नियोजित ठरावानुसार जागेचे आरेखन करण्यात आले.
मंदिराचे नाव नोंदवून घेण्याच्या सूचना
मंदिराला जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपला कोणताच विरोध नाही. सदर जागा मोजमाप करून घेऊन प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या माध्यमातून मंदिराचे नाव नोंदवून घेण्याच्या सूचना विकास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी मनोहर बांडगी, पोमाणी बांडगी, परशराम गुरव, मनोहर घंटाणी, सागर मरगाण्णाचे, शिवाजी बांडगी, कल्लाप्पा पाटील, सुरेश बांडगी, तेजस्वीनी मरगाण्णाचे, संतोष मरगाण्णाचे, आऊबाई ताशिलदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









