1 जुलैपासून ‘भू सुरक्षा’ पोर्टल कार्यान्वित
बेळगाव : महसूल विभागातील माहितीसाठी आता नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन तासन्तास थांबावे लागणार नाही. 1 जुलैपासून महसूल विभागातील सर्व रेकॉर्ड नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन पाहता येणार आहेत. ‘भू सुरक्षा’ या पोर्टलच्या माध्यमातून जमिनींचे रेकॉर्ड पाहता येणार असल्याची माहिती महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी सोमवारी बेळगावमध्ये दिली.
प्रायोगिक तत्त्वावर ‘भू सुरक्षा’ पोर्टलची काही तालुक्यांमध्ये चाचणी करण्यात आली. या पोर्टलवर महसूल, तसेच जमिनीसंदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे. जुनी कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी आता हे सर्व रेकॉर्ड डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे एका क्लिकवर सर्व माहिती पाहता येणार आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे सर्वत्र सुरू आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व जमिनीचे दस्तऐवज आधारक्रमांकाशी जोडले जात आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्ती उपस्थित असेल तरच जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार यापुढे होणार आहे. सध्या राज्यातील 85 टक्के जमिनीच्या दस्तऐवजांना आधारसोबत जोडण्यात आले असून येत्या काळात उर्वरित 15 टक्के जमिनीही जोडल्या जातील, असा विश्वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.









