33 के. व्ही. पॉवर स्टेशन उभारणार : खानापूर तालुका पंचहमी योजनेच्या बैठकीत माहिती
खानापूर : खानापूर तालुका गॅरंटी योजना कमिटी मासिक बैठक खानापूर तालुका पंचायत सभागृहात गॅरंटी योजनेचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला शासकीय अधिकारी आणि सभासद उपस्थित होते. यावेळी माहिती देताना सीडीपीओ बंजत्री म्हणाले, खानापूर तालुक्यामध्ये 64125 हजार गृहलक्ष्मी लाभार्थी आहेत. या लाभार्थिंना प्रत्येकी 2000 प्रमाणे महिन्याला खानापूर तालुक्यात 12,82,50,000 रुपये बँकेत जमा होत आहेत, अशी माहिती या विभागाचे अधिकारी सीडीपीओ बजंत्री यांनी दिली. हेस्कॉम अधिकारी मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार गृहज्योती लाभार्थी 61556 असून ऑगस्ट महिन्यातील वीज बिलापोटी 1 कोटी 99 हजार 12 इतकी रक्कम वीज बिल माफ म्हणून खानापूर तालुक्याला मिळाले आहे. जांबोटी भागातील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोनारवाडी येथे भाडेतत्त्वावर जागा घेण्यात आली असून या ठिकाणी 33 के.व्ही. पॉवर स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे जांबोटी भागातील समस्येवर कायमचा तोडगा निघणार आहे.
महिलांसाठी शक्ती योजनेत खानापूर डेपोतून महिला मोफत बस प्रवास अंतर्गत ऑगस्ट महिन्यात 1,97,93,413 इतक्या रकमेचा महिलानी मोफत बस प्रवास केला असल्याची माहिती देण्यात आली. अन्न नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी माहिती देताना म्हणाले, खानापूर तालुक्यातील सर्व दुकानदार रेशन पुरवठा सुरळीत करत आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये तांदूळ व जोंधळे देण्यात आले होते. मात्र सप्टेंबर महिन्यात रेशन लाभार्थिंना तांदूळ देण्यात येणार आहेत. युवा निधी या योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यात 8037 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशानुसार ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात पंचहमी योजनेची बैठक घेण्यात येणार आहे. गॅरंटी योजनेत काही अडचणी असतील तर नागरिकांनी बैठकीत मांडाव्यात. त्या सोडवण्यात येतील, असे ते म्हणाले. या बैठकीला गॅरेंटी योजनेचे सदस्य प्रकाश मादार, ईसाखान पठाण, रुद्राप्पा पाटील, बाबू हत्तरवाड, संजय गावडे, प्रियांका गावकर, गोविंद पाटील, विवेक तडकोड, दीपा पाटील, शांताराम गुरव, जगदीश पाटील, युसूफ हरगी व तालुका पंचायत अधिकारी रमेश मेत्री, विजय कोतीन, श्रीकांत सपटला यासह अधिकारी उपस्थित होते.









