मृतदेहाचे केले जाते जतन
जगातील अनेक ठिकाणांबद्दल फारशी माहिती नसते. वेगवेगळ्या देशांमध्ये अशा अनेक प्रथा-परंपरा आहेत, ज्या समजून घेणे अत्यंत अवघड असते. अशीच एक प्रथा इंडोनेशियाच्या एका खास बेटावर असून तेथील एका समुदायाचे लोक ती पार पाडत असतात. मृत लोकांचे शरीर दफन केल्यावर ते बाहेर काढले जाण्याचा प्रकार तुम्ही कधी ऐकला नसेल, परंतु या बेटावर हा प्रकार पारंपरिक स्वरुपात केला जात असतो.
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर ही परंपरा चालत आली आहे. येथे राहणारे टोराजन समुदायाचे लोक स्वत:च्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावरही त्यांना मृत मानत नाहीत. मृतांचे शरीर अनेक आठवडे, महिने आणि अनेकदा कित्येक वर्षांपर्यंत जतन करून ठेवतात. आश्चर्याची बाब म्हणजे या शरीरांना ते एखाद्या आजारी व्यक्तीप्रमाणे वागवत असतात.
टोराजन लोक मृतांना आजारी किंवा झोपेत असलेल्या व्यक्तीप्रमाणे मानतात. मृतांच्या शरीराला ते वेळोवेळी अन्न देत असतात. तसेच स्वच्छ कपडे परिधान करत असतात. मृतांच्या शरीराला स्वत:च्या आर्थिक स्थितीनुसार लोक घरात ठेवत असतात. गरीब लोक लवकर अंत्यसंस्कार करतात. तर श्रीमंत लोक अनेक वर्षांपर्यंत मृतदेह घरात ममीच्या स्वरुपात जतन करून ठेवतात. त्यांना तेथे तोमाकुल म्हणजेच आजारी व्यक्ती मानले जाते. तसेच या मृतदेहांना अंतिम निरोप देण्याची पद्धतही अत्यंत वेगळी आहे.
रेड्याशिवाय होत नाहीत अंत्यसंस्कार
ज्याप्रकारे हिंदू धर्मात मृत्यूदेवता यमराजाचे वाहन रेडा असल्याचे मानले जाते, त्याचप्रकारे टोराजन समुदाय रेड्याला परलोकाचे वाहन मानतात. मृत व्यक्तीकडे रेडा नसल्यास तो लवकर परलोकात पोहोचत नसल्याचे समुदायाचे मानणे आहे. मृत्यूनंतर आत्मा आकाशात पुया म्हणून परततो. हे लोक अंत्यसंस्कारानंतर देखील पूर्वजांच्या थडग्याच्या ठिकाणी दरवर्षी जात असतात. तेथून मृतदेह बाहेर काढून स्वच्छ केले जातात आणि नवे कपडे मृतदेहांना परिधान करून ते पुन्हा गाडले जातात.









