छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मुस्लिम तसेच अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूरात स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. एका मोठ्या षड्यंत्राद्वारे देशभरातील भूमी हडपण्याचा अतिशय गंभीर प्रकार वक्फ कायद्याच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे ‘वक्फ बोर्डा’चे सर्व अधिकार काढून घेऊन ‘लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करण्याची मागणी हिंदुत्वादी संघटनेने केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध आंदोलनात हि मागणी करण्यात आली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘वक्फ बोर्ड भूमी हडपणार ! यानंतर त्याची तक्रार वक्फकडेच करायची आणि त्यापुढे जाऊन तपास वक्फच करणार अन् निवाडाही वक्फच देणार ! त्यामुळे येथे न्याय सोयीस्करपणे वक्फ बोर्डाच्या बाजूने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा धार्मिक पक्षपाताचा कळस आहे.’’ असेही ते म्हणाले.
या आंदोलनात, आतापर्यंत वक्फ बोर्डाने हस्तगत केलेल्या जमिनी मूळ मालकाला देऊन वक्फ बोर्डाचा अधिकार काढून घ्यावेत. तसेच देशात ‘समान नागरी कायदा’ लागू करून सर्व विशेष सुविधा, कायदे, आयोग, मंडळे, शासकीय विभाग संपुष्टात आणून सर्वांना समान वागणूक देण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली आहे.









