पत्रकार परिषदेत भाजप युवा नेते संदीप गावडे , सरपंच सागर ढोकरे यांची माहिती
सावंतवाडी प्रतिनिधी.
गेळे येथील सुमारे २६९ शेतकऱ्यांच्या नावे आता त्यांच्या हक्काची जमीन सातबारा नोंद होणार आहे. काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खऱ्या अर्थाने गेळे गाववासियांच्या हक्काची जमीन त्यांच्या नावे होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे जमिनीविना असणाऱ्या गेल्या कित्येक पिढयांना आता हक्काची जमीन मिळणार असून आता खऱ्या अर्थाने हा गाव महाराष्ट्र शासनाच्या सातबारा नोंदणीतून स्वतंत्र झाला आहे.पालकमंत्री नितेश राणे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळेच या गावात आता जमीन वाटप व सातबारावर जमिनी लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती भाजपचे युवा नेते संदीप गावडे व सरपंच सागर ढोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरपंच श्री ढोकरे यांनी संदीप गावडे यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला. आमचा गाव आता खऱ्या अर्थाने मुक्त झाला आहे . आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याची भावना श्री ढोकरे यांनी व्यक्त केली आहे. श्री गावडे म्हणाले की गेले 385 दिवस आम्ही यासाठी लढत होतो . अखेरीस 287 हेक्टर शासनाच्या जमिनीतील वाटप प्रक्रियेला काल स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे आता वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 269 कुटुंबीयांच्या नावे सातबारा होणार आहेत . त्यापैकी ५ गुंठे जागा व्यावसायिक तर 50 गुंठे जागा शेतजमीनसाठी असे तुकडे प्लॉट करण्यात आले आहेत आणि तसे वाटप आणि नोंदणी सातबारावर होणार आहे. मात्र शक्तिपीठ महामार्गासाठी 122 एकर जमीन ठेवण्यात आली आहे. त्या जमिनीची भरपाई गाववासीयांना मिळावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे श्री गावडे यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर ,मनोज नाईक, तानाजी गावडे ,सुशांत गावडे ,दयानंद गावडे ,चौकूळ सरपंच गुलाब गावडे आधी उपस्थित होते.









