रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रंप यांचे मतप्रदर्शन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात येत्या 15 ऑगस्टला चर्चा होणार आहे. या चर्चेच्या माध्यमातून रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांनी त्यांच्या भूमीची काही प्रमाणात अदलाबदल करावी आणि हा संघर्ष संपवावा, असा उपाय ट्रंप सुचविणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.
युव्रेनच्या काही भागांवर रशियाने आपले वर्चस्व मिळविले आहे. हा भाग रशियाकसाठी अत्यंत महत्वाचा आहे. रशियाच्या उत्तरेकडची बंदरे वर्षातील जवळ जवळ 8 महिने अतिथंडीमुळे बंद असतात. परिणामी रशियाला जगाशी व्यापार करण्यासाठी दक्षिणेकडची बंदरेच उपयुक्त आहेत. तथापि, युक्रेन रशियाला या बंदरांचा उपयोग करु देत नाही. रशियाच्या वाहतुकीत त्या देशाकडून अडथळे आणले जातात, असा रशियाचा आरोप आहे. रशियाने युक्रेनशी युद्ध पुकारल्याचे हे एक महत्वाचे कारण असल्याचे प्रतिपादन रशियाने केले आहे.
ट्रंप मध्यस्थीस सज्ज
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्यास सज्ज आहेत. युव्रेनचा जो भाग रशियाने घेतला आहे, त्या बदल्यात रशियाने आपली भूमी युव्रेनला द्यावी, असा ट्रंप यांचा तोडगा आहे. रशियाने तो मान्य केल्यास दोन्ही देश संघर्ष थांबविण्याची शक्यता आहे. मात्र, पुतीन हा पर्याय मान्य करतील काय आणि कोणत्या भूमीच्या अदलाबदलीसाठी ते राजी होतील, हा प्रश्न आहे.
यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह
ट्रपं आणि अध्यक्ष पुतीन यांच्यातील चर्चा यशस्वी व्हावी अशी जगाची इच्छा असली, तरी ते शक्य होईल काय यावर तज्ञांनी संशय व्यक्त केला आहे. रशिया युक्रेनशी चर्चा करण्यास राजी नाही, हे स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे ट्रंप यांना या दोन्ही नेत्यांची स्वतंत्ररित्या चर्चा करावी लागेल, अशी चिन्हे आहेत.









