पुणे : दरडप्रवण क्षेत्रात समावेश असलेल्या मुळशी तालुक्यातील घुटके गावात जमीन खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 14 कुटुंबांचे तात्पुरत्या बांधलेल्या निवासी पत्रा शेडमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. (Land eroded in Ghutke village, 14 families relocated) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या गावाला भेट देऊन कुटुंब आणि पशुधनाच्या स्थलांतरणाची पाहणी केली.
मागील वर्षी पावसानंतर या ठिकाणच्या लोकवस्तीच्यावरील डोंगराच्या जमीनीला 1 फुटाची भेग पडल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले होते. त्यानंतर भूवैज्ञानिकांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन पाहणी व अभ्यास केला. अभ्यासाअंती मूळ ठिकाणाहून जमीन सरकल्याचे आढळून आले. तसेच पावसादरम्यान या भेगेतून पावसाचे पाणी पाझरुन जमीनीखाली कठीण खडकाच्यावरुन आणि घरांच्या पायाखालून वाहत असल्याचेही निदर्शनास आले होते. ही बाब लोकवस्तीला धोकदायक असल्याने यंदा खबरदारी म्हणून तेथील 14 कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभामंडपात स्थलांतरीत करण्यात आले आहे.
फियाट इंडिया प्रा. लि. च्या सहकार्याने प्रत्येकी 2 खोल्यांची 16 पत्र्याच्या शेडची निवारा केंद्रे बनवण्यात आली असून, त्यासाठी गावचे सरपंच श्रीराम वायकर यांनी जमीन दिली आहे. याव्यतिरिक्त पुणे जिल्हा परिषदेने या कुटुंबांच्या पशुधनासाठी गोठे बांधले आहेत.जिल्हा परिषदेने या लोकवस्तीला पाणीपुरवठा योजना उभारली आहेत. सौरदिवे तसेच अन्य मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या आहेत. गॅस सिलेंडर, शेगडीही देण्यात आली असून कोविड क्वारंटाईन केंद्रांमधील खाटा, तसेच न वापरलेल्या नवीन गाद्याही या प्रत्येक कुटुंबांना देण्यात आल्या आहेत.








