हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथील घटना : दिवसाढवळय़ा चोऱयाचे सत्र सुरूच, फोंडा शहरात सीसीटीव्ही निष्क्रीय,वाढत्या चोरीच्या घटनामुळे फोंडा पोलीस सॉफ्ट टार्गेट
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा शहराला लागून असलेल्या कुर्टी येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील दुसऱया मजल्यावरील नरसिंह नारायण नाईक यांच्या मालकीचा फ्लॅट अज्ञात चोरटय़ांनी फोडून सुमारे 12 लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरटय़ानी मुख्य प्रवेशद्वाराची कडी तोडून फ्लॅटात प्रवेश घेतला. त्यानंतर बॅडरूमातील लोखंडी कपाट फोडून किमतीचे सोन्याचे दागिन्यासह चोरटे पसार झाले. चोरीची घटना काल सोमवार सकाळी 11 वा. सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फेंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यू हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथील इमारतीच्या एम-23 दुसऱया मजल्यावरील फ्लॅटात हा प्रकार घडला. चोरटय़ानी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश घेतला. चोरटय़ांनी सोन्याचे अंगटी, कानाचे दागिने घेऊन पळ काढला. फ्लॅटात कुणीच नसल्याचे साधून चोरटय़ांनी डाव साधला. पुर्वनियोजित आखलेला चोरीचा कट असल्याचा संशय फोंडा पोलिसांनी व्य़क्त केला असून एखाद्या लोखंडी कपाट निर्मितीतील कारागिराप्रमाणे सफाईदारपणे चोरी केल्याचे आढळल्याने त्या दिशेने तपास सुरू आहे.
नरसिंह नेहमी घरीच असायचे, बाहेर पडले त्याचदिवशी चोरी
नरसिंह नाईक हे नेहमी फ्लॅटातच असायचे. आज नेमक्या घटनेच्या दिवशी ते कुर्टी येथील पंचायतीत काम काढल्याने तलाटीला भेटण्य़ासाठी बाहेर पडले होते. तेव्हाच हे कृत्य़ घडले. मागील 27 वर्षापासून नरसिंह आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहत आहे. सकाळी पत्नी गोवा बागायतदार येथे कामाला गेली तर दोन्ही मुलगेही बेतोडा व पुंडई येथे कामाला गेले होते. नरसिंह हे एमआरएफ कंपनीत सेवानिवृत्ती घेतल्यानंतर घरीच असायचे नेमके ते घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या दोन तासात हा चोरीचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.
…. समोरचा कुलुपबंद फ्लॅटात होते दोघे अल्पवयीन
चोरीची घटना घडलेल्या नरसिंह यांच्या फ्लॅटासमोर एका कोल्हापूर येथील कुटूंबिय राहत आहेत. तो बाहेरून कडीलावल्यागत असतो मात्र आतमध्ये त्याचे दोन अल्पवयीन मुलगे असतात. यावेळीही ते आतमध्येच होते, त्यानाही तोडफोडीचा अंधूक असा आवाज ऐकू येत होता. चोरटयानी नरसिंह ऐवजी समोरच्या कुलुपबंद फ्लॅट फोडण्य़ाचे धाडस केले असते तर त्या चिरमुंडय़ाचे काय झाले असते हाच सद्या या कॉलनीत चर्चेचा विषय ठरला आहे. सदर इमारतीत सहा फ्लॅट आहेत. दुसऱया मजल्यावर दोन फ्लॅट कुलुपबंद होते, चोरटय़ानी एकच फ्लॅट फोडून पलायन केले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
आपले दागिने गेल्याचे दुःख कमी, माहेरचे गेले त्याचा मनस्पात
चोरीला गेलेल्या दागिन्यामध्ये नरसिंह यांच्या माहेरच्याकडून ठेवण्यात आलेल्य़ा दागिन्याचा समावेश आहे. माहेरच्या मंडळीकडून सुखरूप ठेवण्यासाठी दिलेले दागिने चोरीला गेल्याने त्याना अधिक मनस्पात झाला आहे. सावर्डे येथील मेव्हण्याचे नवीन घर बांधणीचे काम सुरू असल्यामुळे दागिने बहिणीकडे ठेवायला दिले होते.
यावेळी घरात मुलाने नवीन वाहन खरेदी करण्यासाठी सुमारे एक लाख रूपये रोख मोबाईलच्या रिकाम्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. ते चोरांच्या निदर्शनास न आल्यामुळे रोख रक्कम सहिसलामत राहिली. दोन लोखंडी कपाटे एकात रांगेत आहेत चोरटय़ांनी नेमके दागिने असलेलेच कपाट फोडलेले आहे. कटरच्या सहाय्याने दाराची कडी व नंतर बेडरूममध्ये प्रवेश घेत पत्र्याच्या लोखंडी कपाटाचा जोडणारा भाग कापून कपाट फोडलेले आहे. चोरटय़ांनी कपाट फोडतानाही एखादा कपाट निर्मितीत लोखंडी कपाट कारिगिरी व लॉक लावण्याचे काम करणाऱयाप्रमाणे कपाट फोडण्याचे काम चोख बजावलेले आहे.
चोरीची घटना सकाळी 11 वा. सुमारास घडली मात्र फॉरन्सिक व श्वानपथक सायंकाळी 6 वा. सुमारास घटनास्थळी पोचले, तसेच पोलीस निरीक्षकाचाही संपर्काबाहेर होते. त्यानंतर श्वानपथक व ठसेतज्ञाना पाचारण करून नमूने गोळा केले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरोधात भा.दं.सं. 454, 380 कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.
लाखो रूपये खर्चुन फ्लॅट, मात्र सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष
आज शहर परिसरात लाखो रूपये खरेदी करून फ्लॅट विकत घेतात खरे मात्र चोरीच्या घटनापासून सावधगिरी बाळगण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली आढळत नाही. इमारतीच्या निवासी गाळय़ात गृहसोसायटी स्थापन करतात मात्र सीसीटीव्ही बसविण्याकडे उदासीन धोरण अवलंबत असल्याचे पोलिसांनी तपासाअंती स्पष्ट झालेले आहे. फोंडा शहराला लागून औद्योगिक वसाहत असल्यामुळे बिगरगोमंतकीयाचा भरणा या भागात जास्त असतो. वारंवार घडणाऱया चोऱयाच्या घटनामुळे सीसीटीव्ही अंत्यत गरज आहे. फोंडा शहरातील मोक्याच्या ठिकाणातील सीसीटीव्ही कॅमेरे शोभेची वस्तू बनून राहिलेले असून फोंडा पालीकेकडे व उपजिल्हा कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही राज्यात सीसीटीव्ही दुरूस्ती होत नसल्याची खंत पोलीस करीत आहे.









