वृत्तसंस्था/ पुणे
येथे सुरु असलेल्या 24 व्या खुल्या राष्ट्रीय नवकानयन स्पर्धेत सेनादलाचा सलमान खान आणि महाराष्ट्राचा दत्तू भोकनाळ यांनी पुरुष एकेरी स्कूल्स प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 2022 साली नवकानयन या प्रकारात राष्ट्रीय विजेता सलमान तसेच 2018 च्या रियो ऑलिपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारा दत्तू यांची पुण्यातील या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी झाली आहे.
हरियाणाच्या सलमान खानने पुरुषांच्या 500 मी. स्प्रिंट सिंगल स्कूल्सच्या उपांत्य लढतीत सतनाम सिंगला मागे टाकत अंतिम फेरी गाठली तर महाराष्ट्राच्या दत्तू भोकनाळने टोकियो ऑलिपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया सेनादलाच्या अरविंद सिंगला मागे टाकत अंतिम फेरीत स्थान मिळविले. महिलांच्या विभागात केरळ, मनिपूर आणि हरियाणाच्या स्पर्धकांनी तीन विविध प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे.









