रांची / वृत्तसंस्था
झारखंड उच्च न्यायालयाकडून लालूप्रसाद यादव यांना सशर्त जामीन मिळाला आहे. डोरंडा कोषागारातून अवैध पैसे काढल्याप्रकरणी लालूंना 66 दिवसांनंतर दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना सीबीआय न्यायालयाने निश्चित केलेल्या दंडाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम जमा करावी लागणार आहे. लालूंना तीन अटींवर जामीन मिळाला आहे. यामध्ये 10 लाखांच्या बाँडची रक्कम जमा करणे तसेच जामिनाच्या वेळी उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, त्यांना संपर्क क्रमांक आणि पत्ता न बदलण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंग यांच्या न्यायालयात शुक्रवारी डोरंडा टेझरीमधून अवैध पैसे काढल्याप्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी निकाल दिला. लालूप्रसाद यादव यांनी 40 महिने तुरुंगात काढल्याचा युक्तिवाद लालूंच्या वकिलांनी केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन देण्याबाबत सकारात्मक विचार केला. गेल्या सुनावणीदरम्यान सीबीआयने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. 15 फेब्रुवारी 2022 रोजी या प्रकरणात लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आले होते. आतापर्यंत चार प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे.









