वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथे वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मुस्लीम संघटनांकडून धरणे आंदोलन केले जात आहे. पाटण्यातील गर्दनीबाग येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रीय जनता दलाने पाठिंबा दर्शविला आहे. यानुसार राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी संबंधित ठिकाणी जात आंदोलनात भाग घेतला आहे.
आमचे नेते लालूप्रसाद यादव हे मुस्लीम संघटनांसोबत उभे ठाकले आहेत. आमचा पक्ष सत्तेवर असो किंवा नसो आम्ही या विधेयकाच्या विरोधात असणार आहोत. विधानसभा आणि विधान परिषदेत आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला आहे. या विधेयकाला घटनाविरोधी आणि लोकशाहीविरोधी मानतो. काही लोक देश तोडण्याचा कट रचत असून आमचा पक्ष हे विधेयक रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी आंदोलकांना संबोधित करताना केला आहे.
बिहार विधानसभेत आमच्या पक्षाने स्थगन प्रस्ताव देत संबंधित विधेयकावर चर्चेची मागणी केली होती. परंतु सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. आम्ही कुठल्याही स्थितीत हे विधेयक संमत होऊ देणार नाही. राष्ट्रीय जनता दल या विधेयकाच्या विरोधात मुस्लीम संघटनांसोबत ठामपणे उभा असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.









