महिलेसोबतची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कारवाई
वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांची पक्षातून आणि कुटुंबातून हकालपट्टी केली आहे. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लालूंनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. अनुष्का यादवसोबतच्या व्हायरल व्हिडिओनंतर तेजप्रताप यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
तेजप्रताप यादव यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती. या पोस्टमध्ये आपण अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबत 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून आम्ही एकमेकांवर प्रेम करत असल्याचे स्पष्ट केले होते. तथापि, रात्री उशिरा त्यांनी आणखी एक पोस्ट करत आपले सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचे सांगत आपल्याला बदनाम करण्यासाठी यापूर्वीची पोस्ट करण्यात आल्याची सारवासारव केली होती. मात्र, या पोस्टमुळे संतप्त झालेल्या लालूंनी तेजप्रताप यांची पक्षातून व कुटुंबातून हकालपट्टी केली.
लालू यादव यांनी रविवारी ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये आपला निर्णय जाहीर केला आहे. ‘वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे कारनामे, सार्वजनिक वागणे आणि बेजबाबदार वर्तन हे आपल्या कौटुंबिक मूल्यांना आणि संस्कारांना अनुसरून नाही. त्यामुळेच मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकतो. आतापासून, त्याची पक्ष आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्याला 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात येत आहे’, असे लालूंनी स्पष्ट केले आहे.
राजदमधून सहा वर्षांसाठी बाहेरचा रस्ता
लालू यादव यांनी ‘आतापासून, त्यांना पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे. तेजप्रताप स्वत: आपल्या वैयक्तिक जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. ज्यांचे त्याच्याशी संबंध आहेत त्यांनी स्वत:च्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच जनमानसात सार्वजनिक लज्जेचा समर्थक राहिलो आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि तिचे पालन केले आहे. धन्यवाद.’ असेही लालूंनी पुढे म्हटले आहे.









