वृत्तसंस्था/ बार्सिलोना
स्पेनच्या हॉकी फेडरेशनच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने इंग्लंडचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. भारतीय संघातील लालरेमसियामीने शानदार हॅट्ट्रीक नोंदवली.
या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा हा पहिला विजय आहे. या स्पर्धेत यापूर्वी भारताने झालेले दोन्ही सामने बरोबरीत राहिले होते. भारताने यापूर्वीच्या सामन्यात इंग्लंडला 1-1 असे तर दुसऱ्या सामन्यात यजमान स्पेनला 2-2 असे बरोबरीत रोखले होते.
शनिवारच्या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत इंग्लंडने वेगवान खेळावर अधिक भर दिला होता पण भारताच्या आघाडीफळीने तसेच बचावफळीने इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. 13 व्या मिनिटाला दीप ग्रेस एक्काने दिलेल्या पासवर लालरेमसियामीने संघाचा आणि वैयक्तिक पहिला गोल नोंदवला. 17 व्या मािनिटाला लालरेमसियामीने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने 2-0 अशी आघाडी इंग्लंडवर घेतली होती. सामन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत गोल नोंदवला गेला नाही. या दरम्यान इंग्लंडने गोल करण्याच्या किमान दोन संधी वाया घालवल्या. सामन्यातील 56 व्या मिनिटाला लालरेमसियामीने भारताचा आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून इंग्लंडचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. इंग्लंडला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. आता या स्पर्धेत रविवारी भारत आणि स्पेन यांच्यात सामना होणार आहे.









