महिलांचा मोफत प्रवास : कर्नाटक बसला प्राधान्य : महाराष्ट्र महामंडळाला फटका
बेळगाव : सरकारने पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे सीमा हद्दीत धावणाऱ्या लालपरीला प्रवासी मिळेनासे झाले आहेत. विशेषत: महिलांकडून मोफत प्रवासासाठी कर्नाटक बसेसना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लालपरीतून केवळ महाराष्ट्र रहिवासी असलेल्या महिलांचाच प्रवास होताना दिसत आहे. काही वेळा लालपरी सीमाहद्दीत रिकामी धावत आहे. सरकारने 11 जूनपासून कर्नाटकात महिलांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे बसमध्ये महिलांची गर्दी वाढू लागली आहे. दुसरीकडे सीमाहद्दीत धावणाऱ्या लालपरीला प्रवासी मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे सीमाहद्दीत फिरणाऱ्या लालपरीला फटका बसू लागला आहे. सीमाहद्दीत प्रवास करताना महिला प्रवासी मोफत प्रवासामुळे कर्नाटकच्या बसेसना प्राधान्य देऊ लागले आहे. त्यामुळे लालपरीमध्ये केवळ पुरुष प्रवास करताना दिसत आहेत. शिवाय पासधारक विद्यार्थ्यांनाही कर्नाटक बसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कर्नाटकच्या बसेसना गर्दी होऊ लागली आहे.
कर्नाटकात लालपरीला फटका
कर्नाटक महिलांचा मोफत बसप्रवास सुसाट सुरू झाला आहे. त्यामुळे विविध मार्गांवर प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. असे असले तरी चंदगड, गडहिंग्लज, आजरा, कोल्हापूर आदी भागातून सीमा हद्दीत धावणाऱ्या महाराष्ट्राच्या बसेसला प्रवाशांची संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे काही बसेस रिकाम्या धावताना दिसत आहेत. त्यामुळे लालपरीच्या कर्नाटकातील प्रवासाला फटका बसू लागला आहे.
लालपरीवर परिणाम नाही…
कर्नाटकाच्या बसमध्ये केवळ कर्नाटकातील महिलांना मोफत प्रवास करण्यास मुभा आहे. त्यामुळे लालपरीवर म्हणावा तसा परिणाम झालेला नाही. महाराष्ट्र महिला व इतर प्रवासी लालपरीने प्रवास करतात. प्रवाशांना वेळेत सेवा पाहिजे असल्याने मिळेल त्या बसने प्रवास करतात.
-विजय शिंदे, मॅनेजर, चंदगड डेपो.









