साताऱ्यात लल्लन जाधव आणि साथीदारांची दहशत
सातारा : ‘मी फरारी आहे. मला खर्चाला ५० हजार रुपये दे, असे म्हणत कुख्यात गुन्हेगार लल्लन जाधव याने त्याच्या सात साथीदारांसोबत प्रतापसिंहनगरात राडा घातला. बंदुकीसारखे शस्त्र डोक्याला लावत एकाला मारहाण करुन लुटमार केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. लल्लन जाधव, निखिल काळे, वाढीव (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह आठ जणांविरुद्ध रणजित नवनाथ कसबे (वय ३०, सर्व रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना ८ नोव्हेबर रोजी प्रतापसिंहनगर मध्ये घडली आहे.
तक्रारदार रणजित कसबे हे चौकात थांबले असताना संशयित टोळी तेथे आली. लल्लन जाधव याने कसबे यांच्याकडे ५० हजार रुपये मागितले. कसबे यांनी पैसे नसल्याचे सांगताच संशयितांनी त्यांना मारहाण केली. डोक्याला पिस्तुलसारखे हत्यार लावून कसबे त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. लाथा बुक्क्यांनी मारहाण करत कसबे यांच्या खिशातील ३० हजार रुपये काढून घेतले.
यावेळी टोळक्यातील एकाने धारदार चाकूने हल्ला केल्याने कसबे हे जखमी झाले. हल्ल्यानंतर संशयित पसार झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांना याची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. कसबे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.









