95 वा जन्मदिन केला साजरा ः अडवाणींच्या निवासस्थानी पोहोचले मोदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मंगळवारी 96 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी जात अडवाणी यांचे अभीष्टचिंतन केले आहे. मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील अडवाणी यांच्या निवासस्थानी पोहोचले. राजनाथ सिंह यांनी अडवाणी यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर करत ‘देवाकडे त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुची प्रार्थना करतो’ असे नमूद केले आहे.
8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची शहरात अडवाणी यांचा जन्म झाला होता. 2002-04 दरम्यान लालकृष्ण अडवाणी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्रिपद भूषविले आहे. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. 2015 मध्ये अडवाणींना पद्मविभूषणने गौरविण्यात आले होते.
अडवाणी यांच्या प्रत्येक जन्मदिनी पंतप्रधान मोदी हे त्यांच्या निवासस्थानी जात शुभेच्छा देत असतात. भारताच्या विकासात अडवाणी यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांची दूरदृष्टी आणि बुद्धिमत्तेसाठी पूर्ण भारतात त्यांचा सन्मान केला जातो. भाजपची स्थापना आणि त्याला बळकट करण्यात अडवाणी यांची भूमिका अद्वितीय आहे. त्यांच्या दीर्घ आणि तंदुरुस्त जीवनासाठी प्रार्थना करत असल्याचे मोदींनी ट्विट करत म्हटले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी सातत्यपूर्ण परिश्रमाद्वारे देशभरात पक्षसंघटन मजबूत केले आणि सरकारचा हिस्सा म्हणून काम करत असताना देशाच्या विकासातही अमूल्य योगदान दिल्याचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत.
देश, समाज आणि पक्षासाठी अडवाणी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतीय राजकारणातील महान व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्र आणि पक्षाला समर्पित अडवाणी यांचे जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत असल्याचे विधान भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी तसेच आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनीही अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत.









