वृत्तसंस्था/ मुंबई
भारताच्या ललित बाबूने बुधवारी उच्च टाय-ब्रेक स्कोअरच्या आधारे आर्मेनियाच्या मामिकोन घरिबयानला पराभूत करून मुंबई आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ग्रँडमास्टर बाबूने त्याचा नववा आणि शेवटचा फेरीचा सामना अव्वल मानांकित जॉर्जियन ग्रँडमास्टर लव्हिन पंतसुलियाविऊद्ध जिंकून आपली गुणसंख्या 8 वर नेली.
परंतु त्याला काही चिंताग्रस्त क्षण घालवावे लागले. कारण घरिबयानने भारतीय ग्रँडमास्टर नीलोत्पल दासविऊद्ध अंतिम सामना जिंकून आपली गुणसंख्याही आठवर नेली. तथापि घरिबयानच्या 54 च्या तुलनेत बाबूच्या 54.5 च्या उच्च टाय-ब्रेक स्कोअरमुळे भारतीय खेळाडूने चमकदार चषक मिळविला आणि विजेत्यासाठीचे 4 लाख ऊपयांचे बक्षीस आपल्या खात्यात जमा केले.
घरिबयान उपविजेता ठरून त्याला 3 लाख रुपये प्राप्त झाले. आणखी एक भारतीय खेळाडू दीपन चक्रवर्ती पाचव्या स्थानावर राहिला आणि त्याने 1.25 लाख ऊ. जिंकले. कनिष्ठ गटात भारताचा पॅंडिडेट मास्टर मधेश कुमारने शेवटच्या फेरीत व्योम मल्होत्रावर विजय मिळवत एकूण आठ गुण मिळवले. मधेशने आपल्या शांतपणे आणि एकाग्रतापूर्वक केलेल्या खेळाच्या जोरावर सर्वांना प्रभावित करताना विजेतेपद पटकावले आणि 2 लाख ऊ. मिळवले.
अद्विक अग्रवाल उपविजेता राहिला आणि त्याला 1.5 लाख ऊ. मिळाले. अव्वल मानांकित अंश नेऊरकरला तिसऱ्या स्थानासह 1 लाख ऊपयांवर समाधान मानावे लागले. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे माधवेंद्र प्रताप शर्मा (75,000 रु.) आणि जगरित मिश्रा (50,000 रु.) हे राहिले. सन्निधी भटला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू घोषित करण्यात आले आणि तिला 45 हजार ऊ. व चषक प्राप्त झाला.









