13 लाख जनावरांना टोचणार लस
बेळगाव : लाळ्याखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते चौथ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला चालना देण्यात आली. यावेळी गोमातेचे पूजन करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात 5 लाख 49 हजार 540 गाय आणि बैलांची संख्या आहे. तर 8 लाख 44 हजार 744 म्हशी आहेत. एकूण 13 लाख 93 हजार 711 जनावरांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यांना 14 लाख 57 हजार 800 डोस पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन चार वर्षांवरील जनावरांना लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी जनावरांना लस करून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन खात्याने केले आहे. अलिकडे जनावरांना लम्पी आणि इतर आजारांची लागण होवू लागली आहे. त्यामुळे पशुपालकांना फटका बसू लागला आहे. यासाठी पशुसंगोपन खात्याने खबरदारी म्हणून प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना, पशुमित्र आणि पशुसखी यांची मदत मिळणार आहे. यावेळी पशुसंगोपनचे सहसंचालक डॉ. राजीव कुलेर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पाटील, डॉ. दीपक यल्लीगार, डॉ. प्रताप हन्नुरकर यासह पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
मोहीम वर्षातून दोनवेळा
गतवर्षी लम्पी जीवघेण्या आजाराने 30 हजारांहून अधिक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालकांमधून धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, लाळ्याखुरकत मोहीम वर्षातून दोनवेळा राबविली जाते. ओल्या चाऱ्यातून जनावरांना विविध आजारांची लागण होते. हे टाळण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे, अशी माहिती खात्याने दिली आहे.









