बराच गाजावाजा करून रिलीज झालेल्या ‘लालसिंग चढ्ढा’ या अमिर खान निर्मित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सणसणीत आपटी खाल्ली आहे. 180 कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्याची जाहिरातबाजीही मोठय़ा प्रमाणात करण्यात आली होती. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याच्या विरोधात प्रभावी हॅशटॅग अभियान चालविण्यात आले होते. त्या अभियानाचा परिणाम इतका मोठा होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. ‘अमिर खान’ या नावावरच चित्रपट तरून जाईल, अशी अनेकांची समजूत होती.

तथापि, अलीकडच्या काळात चित्रपट चाहत्यांच्या मानसिकतेतच परिवर्तन झालेले दिसत आहे. हिंदू धर्म, भारताची पुरातन संस्कृती आणि आपला न शिकविण्यात आलेला इतिहास यांच्यासंदर्भात जनमानसात मोठी जागृती झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे या विषयांना वाहिलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करताना दिसत आहेत. ‘कार्तिकेय-2’ हा चित्रपट या बदलत्या वातावरणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ‘लालसिंग चढ्ढा’ आणि ‘दो बारा’ या दोन्ही चित्रपटांना बरेच मागे टाकत ‘कार्तिकेय-2’ने बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली आहे. हा नवा पायंडा ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटापासून पडल्याचे दिसून येत आहे. चित्रपट चाहत्यांच्या या बदलत्या अभिरुची संबंधाने बॉलिवूड तज्ञही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. चित्रपटाचे दर्शक आता केवळ चित्रपटच पाहात नाहीत तर चित्रपटनिर्मात्याची पार्श्वभूमीही तपासतात, असे दिसून येते. अमिर खानने 2015 मध्ये देशातील कथित असहिष्णुतेवर टिप्पणी केली होती. तसेच ‘देश सोडावासा वाटतो’ अशी भाषा केली होती. सर्वसामान्य लोकांना ही भाषा मुळीच आवडली नव्हती. त्या टिप्पणीची किंमत अमिर खान चुकवावी लागत आहे, अशी बॉलिवूड वर्तुळात आहे. अमिर खानने तुर्कियेच्या पंतप्रधानांच्या पत्नीच्या उपस्थितीत भारतीय घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याच्यासंदर्भातही काही टिप्पणी केली होती. या सर्वांचा परिणाम त्याच्या चित्रपटांवर होताना दिसतो. बॉलिवूडसाठी हा एक मोठा इशाराच आहे, असे मानले जात आहे.









