पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजस्थानात विरोधक लक्ष्य : ‘इंडिया’च्या प्रत्युत्तरात ‘भ्रष्टाचार भारत छोडो’चा नारा
वृत्तसंस्था /सीकर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या शेखावटी भागात भाजपच्या प्रचारमोहिमेला सुरुवात करत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वीच राजस्थानच्या विकासाचे सत्र आरंभिण्यात आले आहे, परंतु जेव्हापासून राज्यात काँग्रेसचे सरकार आले आहे, तेव्हापासून विकासाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. काँग्रेस सरकारचा अर्थ लुटीचे दुकान आणि असत्याचा बाजार. या लुटीच्या दुकानाचे नवे प्रॉडक्ट ‘लाल डायरी’ असल्याची टीका मोदींनी केली आहे. कुणीही कितीही जोर लावला तरीही लाल डायरी या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करणार आहे. लाल डायरीच्या नावानेच काँग्रेस नेत्यांची तोंडं बंद होत आहेत. लोकशाहीत सरकारला स्वत:च्या कामाचा हिशेब द्यावा लागतो, परंतु चार वर्षे केवळ झोपी गेलेला स्वत:च्या कामाचे हिशेब काय देणार? काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारचा प्रत्येक दिवस परस्परांमधील चढाओढ, वर्चस्वाच्या लढाईत वाया घालविल्याचा आरोप मोदींनी केला आहे. लाल डायरीत काँग्रेस सरकारची कृष्णकृत्यं नमूद आहेत. लाल डायरीची पाने खुली झाल्यास अनेक जण तुरुंगात जातील असा दावा मोदींनी केला आहे.
क्विट इंडियाचा नारा
मोदींनी राजस्थानातून विरोधी पक्षांना लक्ष्य करत क्विट इंडियाचा नारा देखील दिला. स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधींनी इंग्रंजांसाठी भारत छोडोचा नारा दिला होता. तसेच समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचार क्विट इंडिया, दहशतवाद क्विट इंडिया, घराणेशाही क्विट इंडिया यासारख्या नाऱ्यांची गरज असल्याचे मोदी म्हणाले.
राजस्थानात पेपर लीक उद्योग
सीकरला शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाते. परंतु येथील सत्तारुढ पक्षाचे नेते पेपर लीक करण्याचा उद्योग चालवत आहेत. तरुण-तरुणींच्या स्वप्नांना पायदळी तुडविणाऱ्या काँग्रेसला सत्तेवरून हटवावे लागणार आहे. राजस्थानात आमच्या सणसमारंभांवरही धोका घोंगावू लागला आहे. कधी कुठून दगड फेकला जाईल, कुठे संचारबंदी लागू होईल हे सांगता येत नाही. राजस्थान स्वत:च्या बहिण-मुलींवरील अत्याचार सहन करू शकत नाही. येथे सामूहिक बलात्कार करून आरोपी व्हिडिओ व्हायरल करत आहेत. छोट्या मुलींपासून शाळेत शिकविणाऱ्या शिक्षिका येथे सुरक्षित नाहीत. काँग्रेसचे नेते कारवाई करण्याऐवजी पीडित महिलांवरच खोटं बोलण्याचा आरोप करत आहेत. राज्यात दलितांवर अत्याचार होत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
नाव बदलून लोकांना मूर्ख ठरविण्याचा प्रयत्न
काँग्रेस अन् त्याच्या सहकारी पक्षांनी नाव बदलण्याची नवी खेळी केली आहे. पूर्वीच्या जमान्यात कुठलीही कंपनी बदनाम झाल्यावर त्वरित कंपनीचे लोक नवा बोर्ड लावून स्वत:चे काम सुरू करायचे. काँग्रेस अन् त्याचे सहकारी पक्ष अशाच फ्रॉड कंपन्यांची नक्कल करत आहेत. युपीए हे नाव बदलून आता इंडिया करण्यात आले आहे. कर्ज माफीच्या नावावर शेतकऱ्यांचा केलेला विश्वासघात खपवून जावा, दहशतवादासमोर पत्करलेली शरणागती जनतेसमोर येऊ नये याकरता हे नाव बदलण्यात आल्याचा दावा मोदींनी केला आहे.
पीएफआय अन् सिमीचा उल्लेख
भारताच्या शत्रूंनी जी पद्धत अनुसरली होती, तीच काँग्रेस अन् त्याच्या सहकारी पक्षांनी अवलंबिली आहे. इंडिया नाव तर ईस्ट इंडिया कंपनीत देखील होते. इंडिया नाव भारत भक्ती दाखविण्यासाठी नव्हे तर भारताला लुटण्याच्या उद्देशाने जोडण्यात आले होते. काँग्रेसच्या शासनकाळात इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) तयार झाली होती, यातही इंडिया शब्द होता. परंतु याचा उद्देश दहशतवाद होता. हे नाव बदलून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया झाले, नाव नवे काम तेच जुने. अशाच प्रकारे काँग्रेस आता युपीएचे घोटाळे लपवू पाहत आहे. त्यांना जर भारताची पर्वा असती तर त्यांनी विदेशींना भारतात हस्तक्षेप करण्यास सांगितले नसते असे म्हणत मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे.









