वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे सुरु असलेल्या अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. लक्ष्यच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले. रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात चीनच्या तिसऱ्या मानांकित ली शी फेंगने लक्ष्यने 21-17, 22-24, 21-17 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 76 मिनिटे चाललेल्या या संघर्षमय सामन्यात लक्ष्यने फेंगला जोरदार टक्कर दिली पण त्याला विजय मिळवण्यात अपयश आले. मागील आठवड्यात कॅनडा ओपन जिंकणाऱ्या लक्ष्यने या स्पर्धेत देखील दमदार सुरुवात केली होती. पण, उपांत्य सामन्यात त्याला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. चीनच्या ली फेंगने पहिला गेम जिंकत शानदार सुरुवात केली. पण दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने त्याला एकेक गुणासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. हा गेम लक्ष्यने 24-22 असा जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मात्र लक्ष्यकडून अनेक चुका झाल्या, याचा फटका त्याला बसला. शनिवारी स्पर्धेत सिंधू व एस शंकर यांना हार पत्कारावी लागली होती. आता, लक्ष्यच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले.