वृत्तसंस्था/ टोकियो
येथे सुरु असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. शनिवारी झालेल्या सामन्यात त्याला इंडोनेशियाचा अव्वल खेळाडू जोनाथन ख्रिस्टीने 15-21, 21-13, 16-21 असे पराभूत केले. लक्ष्यच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले आहे. याआधी पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत व पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग शेट्टी पराभूत झाले आहेत.
यंदा दमदार फॉर्ममध्ये असलेल्या लक्ष्य सेनने मागील महिन्यात कॅनडा ओपन स्पर्धा जिंकली आहे. यानंतर या स्पर्धेत शानदार सुरुवात करताना त्याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. शनिवारच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मात्र त्याच्याकडून चुका झाल्या, याचा फायदा घेत ख्रिस्टीने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आक्रमक खेळणाऱ्या ख्रिस्टीने पहिला गेम 21-15 असा जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र लक्ष्यने पुनरागमन करत दुसरा गेम 21-13 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेम्समध्ये त्याच्याकडून चुका झाल्या. नेटजवळ ख्रिस्टीने सुरेख खेळताना लक्ष्यवर 13-7 अशी आघाडी मिळवली होती. लक्ष्यने काही गुण मिळवले पण त्याला विजयापर्यंत मात्र पोहोचता आले नाही. हा गेम ख्रिस्टीने 21-16 असा जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. आता, अंतिम लढत जोनाथन ख्रिस्टी व डेन्मार्कचा वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सलसेन यांच्यात होईल.









