वृत्तसंस्था /हाँगकाँग
2023 च्या येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या हाँगकाँग खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत सहभागी झालेला भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने माघार घेतली आहे तर या स्पर्धेमध्ये भारताच्या अश्विनी आणि तनीषा यांनी महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीच्या सामन्यात लक्ष्य सेन आणि चीन तैपेईचा सू यांग यांच्यात हा सामना खेळवला जाणार होता दरम्यान सामना सुरु होण्यास केवळ काही तास बाकी असताना लक्ष्य सेनने अचानकपणे माघर घेतल्याचे घोषित केले. त्यामुळे चीन तैपेईच्या यांगला पुढील फेरीसाठी चाल मिळाली. आठव्या मानांकित लक्ष्य सेनने गेल्या जुलै महिन्यात कॅनडा खुली सुपर 500 दर्जाची स्पर्धा जिंकली होती. पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात भारताच्या प्रियांशू राजावतचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. जपानच्या सुनेयामाने राजावतचा 21-13, 21-14 असा पराभव केला.
महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या अश्विनी पोनाप्पा आणि तनीषा क्रॅस्टो यांनी चीन तैपेईच्या लि हेसीन आणि तेंग हेसन यांचा 21-19, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. अश्विनी आणि तनीषा ही जोडी जागतिक महिला दुहेरीच्या मानांकनात 50 व्या स्थानावर आहे. मात्र मिश्र दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनाप्पा आणि बी. सुमीत रे•ाr यांना पहिल्याच फेरीत मलेशियाच्या चेन जी आणि तेन जेसिका यांच्याकडून 19-21, 10-21 अशी हार पत्करावी लागली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीनच्या झेंग मेनने भारताच्या मालविका बनसोडवर 21-14, 21-12 अशी मात केली. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील लढतीत कोरियाच्या हेयुन आणि चिऑल यांनी भारताच्या कृष्णप्रसाद गर्ग आणि विष्णुवर्धन गौड यांचा 21-14, 21-19 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. 2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी हाँगकाँगची ही बॅडमिंटन स्पर्धा पात्र स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे.









