हाँगकाँग ओपन : तैवानचा दिग्गज खेळाडू चोऊ तियानवर लक्ष्यचा शानदार विजय
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन व पुरुष दुहेरीतील जेतेपदासाठी दावेदार असणाऱ्या सात्विक-चिराग या भारतीय जोडीने हाँगकाँग ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे, लक्ष्य सेनने दोन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेची फायनल गाठली आहे.
हाँगकाँग ओपनमध्ये दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या लक्ष्यने शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात तैवानच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या चोऊ तियानला 23-21, 22-20 असे पराभूत केले. आता, जेतेपदासाठी त्याची लढत चीनच्या चौथ्या मानांकित लि शि फेंगशी होईल. दरम्यान, लक्ष्य व तैवानचा चोऊ तियान यांचा सामना चुरशीचा झाला. पहिल्या व दुसऱ्या दोन्ही गेममध्ये दोन्ही खेळाडूंत एकेका गुणासाठी संघर्ष पहायला मिळाला. सुरुवातीला लक्ष्यने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती पण तियाननेही शानदार खेळ साकारताना एकवेळ 21-21 अशी बरोबरी साधली. यानंतर मोक्याच्या क्षणी लक्ष्यने दोन गुणांची कमाई करत पहिला गेम 23-21 असा जिंकला व 1-0 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्य व तियान यांच्यात चांगलीच टक्कर पहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंनी नेटजवळ सरस खेळ साकारत गुणांची कमाई केली. एकवेळ 18-18, 20-20 अशी बरोबरी होती. पण, लक्ष्यने चिवट खेळ करत हा गेम 22-20 असा जिंकला व फायनलमधील आपले स्थान निश्चित केले.
सात्विक-चिरागचा धडाका
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग जोडीने चिनी तैपेईच्या बिंग वेई लिन-चेन कुआन जोडीला 21-17, 21-15 असे नमवत फायनल गाठली आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीचा सामना चीनच्या लियांग वेई-वांग चांग जोडीशी होईल. 55 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना सर्वोत्तम खेळ साकारला. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात भारतीय जोडीला सहा वेळा उपांत्य फेरीत हार पत्कारावी लागली होती. यानंतर हाँगकाँग ओपनमध्ये सात्विक-चिराग या जोडीने अंतिम फेरी गाठली आहे.









