मॅग्डा लिनेट, जोकोविच, टॉमी पॉल उपांत्य फेरीत, प्लिस्कोव्हा, रुबलेव्ह, शेल्टन पराभूत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारताची मिश्र दुहेरीची जोडी सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून त्यांनी नील स्कुपस्की व डिसायरी क्रॉवझीक या ब्रिटिश-अमेरिकन जोडीचा पराभव केला. महिला एकेरीत मॅग्डा लिनेटने कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली तर पुरुष एकेरीत नोव्हॅक जोकोविच व अमेरिकेचा टॉमी पॉल यांनी शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. प्लिस्कोव्हाप्रमाणे आंद्रे रुबलेव्ह व बेन शेल्टन यांचेही आव्हान संपुष्टात आले.
सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांनी तिसऱया मानांकित नील स्कुपस्की व डिसायरी क्रॉवझीक यांच्यावर 7-6 (7-5), 6-7 (5-7), 10-6 अशी संघर्षपूर्ण लढतीत मात करीत अंतिम फेरी गाठली. सुमारे दोन तास ही चुरशीची लढत रंगली होती. उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी जोडीकडून पुढे चाल मिळाल्यानंतर सानिया-बोपण्णा यांना उपांत्य फेरीत स्थान मिळाले होते. उपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत लॅटव्हियाची एलेना ओस्टापेन्को व स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेझ यांच्याशी होणार होती. पण ओस्टापेन्को-हर्नांडेझ यांनी माघार घेतल्याने भारतीय जोडीला शेवटच्या चारमध्ये स्थान मिळाले होते.
मागील वर्षी विम्बल्डनमध्ये सानियाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत खेळण्याची तिची ती शेवटची वेळ होती. त्यावेळी मेट पॅव्हिकसमवेत ती खेळली होती. पण येथे तिने त्यापुढे मजल मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या महिन्यात होणाऱया दुबई डब्ल्यूटीए स्पर्धेनंतर सानिया टेनिसमधून निवृत्त होणार असल्याने तिची ही शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. भारतीय जोडीने रिओ 2016 ऑलिम्पिकमध्येही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाकी राहिलेली ही भारताची शेवटची जोडी आहे. सानियाने आजवर मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्यात ऑस्ट्रेलिया ओपन (2009), प्रेंच ओपन (2012), यूएस ओपन (2014) जेतेपदांचा समावेश आहे. याशिवाय महिला दुहेरीतही तिने तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

पोलंडच्या मॅग्डा लिनेटने माजी अग्रमानांकित झेकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पराभवाचा धक्का देत ग्रँडस्लॅमची प्रथमच उपांत्य फेरी गाठली. तिने प्लिस्कोव्हावर 6-3, 7-5 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 45 व्या स्थानावर असणाऱया लिनेटने 30 व्या मानांकित प्लिस्कोव्हाला 87 मिनिटांत धक्का देत सनसनाटी निर्माण केली. याआधी एकाही ग्रँडस्लॅममध्ये तिसऱया फेरीच्या पुढे तिला मजल मारता आली नव्हती. तिने आतापर्यंत चार सीडेड खेळाडूंना हरविले असून त्यात ऍनेट कोन्टावेट, एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा, चौथी मानांकित कॅरोलिन गार्सिया व प्लिस्कोव्हा यांचा समावेश आहे. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती पोलंडची तिसरी खेळाडू आहे. याआधी स्वायटेक व ऍग्नीस्का रॅडवान्स्का यांनी असा पराक्रम केला होता. तिची उपांत्य लढत पाचव्या मानांकित आर्यना साबालेन्काशी होईल. दुसरी उपांत्य लढत अझारेन्का व रीबाकिना यांच्यात गुरुवारी होईल.

पुरुष एकेरीत सर्बियाच्या जोकोविचने विजयी घोडदौड पुढे चालू ठेवताना पाचव्या मानांकित रशियाच्या आंद्रे रुबलेव्हवर 6-1, 6-2, 6-4 अशी सहज मात करीत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्याने येथे 9 वेळा जेतेपद मिळविले असून ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही एकूण 44 वेळ आहे. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या टॉमी पॉलने आपल्याच देशाच्या बेन शेल्टनचा 7-6 (8-6), 6-3, 5-7, 6-4 असा पराभव केला. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही पहिलीच वेळ असून 2009 नंतर या फेरीत स्थान मिळविणारा तो अमेरिकेचा पहिला खेळाडू बनला आहे. जोकोविचशी त्याची उपांत्य लढत होईल.









