तनिशा-इशानही विजयी, साई प्रणीत, मालविका, सुमीत रेड्डी-अत्री पराभूत
वृत्तसंस्था/ टोकियो
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णविजेत्या लक्ष्य सेनने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली, मात्र बी. साई प्रणीतचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. याशिवाय महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी आणि मिश्र दुहेरीत तनिशा क्रॅस्टो-इशान भटनागर यांनीही विजय मिळवित दुसरी फेरी गाठली.
लक्ष्य सेनने शानदार विजय मिळविताना डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसचा 21-12, 21-11 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. लक्ष्यने मागील वर्षी स्पेनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदार्पणातच कांस्य जिंकले होते. नववे मानांकन मिळालेल्या 20 वर्षीय लक्ष्यने काही अप्रतिम फोरहँड परतीचे क्रॉसकोर्ट फटके मारत व्हिटिंगहसला जेरीस आणले. व्हिटिंगहसनेही जोरदार प्रयत्न केले. पण लक्ष्यला तो थोपवू शकला नाही. दुसऱया गेममध्ये त्याने जलद रॅलीत गुंतवून लक्ष्यला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक रॅली 31 फटक्यांची होती. पण लक्ष्यने विजयी फटके मारत व्हिटिंगहसचे आव्हान संपुष्टात आणले.

पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात भारताच्या बी. साई प्रणीतचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. तैपेईच्या जागतिक चौथ्या मानांकित चौ तिएन चेनने त्याला 15-21, 21-15, 15-21 असे हरविले. प्रणीतने 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. गेल्या ऑलिम्पिकपासून साई प्रणीतला संघर्षच करावा लागला आहे. ऑलिम्पिकमध्ये तो प्रशिक्षक व फिजिओशिवाय खेळला होता.
राष्ट्रकुलची माजी कांस्यविजेती जोडी अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांनी महिला दुहेरीत विजयी सलामी देताना मालदिवच्या अमिनाथ नबीहा अब्दुल रझाक व फातिमाथ नबाहा अब्दुल रझाक यांच्यावर 21-7, 21-9 अशी सहज मात केली. दुसऱया फेरीत मात्र त्यांना तगडय़ा प्रतिस्पर्धीला सामोरे जावे लागणार असून चीनच्या अग्रमानांकित चेन किंग चेन व जिया यिफान यांच्याशी त्यांना लढावे लागणार आहे.
मिश्र दुहेरीतही तनिशा क्रॅस्टो व इशान भटनागर यांनी यशस्वी सुरुवात करताना जर्मनीच्या पॅट्रिक श्केईल व फ्रान्सिस्का व्होकमन यांना 21-13, 21-13 असे केवळ 29 मिनिटांत हरविले. त्यांची पुढील लढत 14 व्या मानांकित थायलंडच्या सुपाक जोमकोह व सुपिसारा पी. यांच्याशी होणार आहे.
पुरुष दुहेरीत बी.सुमीत रेड्डी व मनू अत्री यांना मात्र पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या मासायुकी ओsनोदेरा व हिरोकी ओकामुरा यांनी त्यांना 21-11, 21-15 असे हरविले. महिला एकेरीत मालविका बनसोडचे आव्हानही समाप्त झाले. डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सनने तिला 21-14, 21-12 असे हरवित दुसरी फेरी गाठली.
तिसऱया मानांकित अँटोनसेनला पराभवाचा धक्का, ऍक्सेलसेन विजयी

तिसरे मानांकन असलेल्या डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला तर त्याचाच देशवासी व्हिक्टर ऍक्सेलसेनने विजयी सुरुवात केली. 2019 मध्ये रौप्य जिंकलेल्या अँटोनसेनला जपानच्या केन्टा निशिमोटोने 21-15, 21-19 असे हरविले. गेल्या मेमध्ये अँटोनसेनला स्नायुदुखापत झाली होती. त्यानंतर तो प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला होता. जागतिक अग्रमानांकित ऍक्सेलसेनने लौकिकाला साजेसा खेळ करीत मलेशियाच्या डॅरेन ल्यूचा 21-16, 21-12 असा पराभव केला. दहा महिन्यानंतर पुनरागमन करणाऱया चीनच्या शि युकीने दुसरी फेरी गाठताना अझरबैजानच्या ऍडे रेस्की द्विकाहयोवर 22-20, 21-10 अशी मात केली.









