वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅनडा ओपनमध्ये जेतेपद मिळविणाऱ्या भारताच्या लक्ष्य सेनने बीडब्ल्यूएफने जाहीर केलेल्या ताज्या मानांकनात सात स्थानांची झेप घेत 12 व्या स्थानावर मजल मारली आहे.
21 वर्षीय सेनने कॅनडा ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑल इंग्लंड चॅम्पियन लि शि फेंगला धक्का देत जेतेपद पटकावले. त्याचे हे सुपर 500 चे दुसरे जेतेपद होते. त्याचे 54,901 मानांकन गुण झाले असून एचएस प्रणॉयनंतरचा तो दुसरा सर्वोच्च मानांकन मिळविणारा भारतीय आहे. प्रणॉयचे 67,677 गुण झाले असूत त्याची एका स्थानाने घसरण झाल्याने तो आता नवव्या स्थानावर आहे. फेंगनेही तीन स्थानांची प्रगती केली असून तो सातव्या स्थानावर आहे. डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेन अग्रस्थानावर असून त्याने 1,01,205 गुण घेतले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरील इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका जिनटिंगने 95661 व तिसऱ्या स्थानावरील जपानच्या कोदाय नाराओकाने 62,063 गुण घेतले आहेत.









