अमेरिकन ओपन बॅडमिंटन : सिंधूची पराभवाची मालिका कायम : युवा एस. शंकरही पराभूत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे सुरु असलेल्या अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शानदार विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत मात्र भारताची अव्वल खेळाडू सिंधूची पराभवाची मालिका कायम राहिली. याशिवाय, एस. सुब्रमण्यम देखील उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आहे. यामुळे स्पर्धेत भारताची मदार लक्ष्य सेनवर असणार आहे.
गत आठवड्यात कॅनडा ओपन जिंकलेल्या लक्ष्यने अमेरिकन ओपनमध्येही दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने मायदेशी सहकारी एस.सुब्रमण्यमचा 21-10, 21-17 असा सहज पराभव केला. हा सामना 33 मिनिटे चालला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या लक्ष्यने या सामन्यात प्रतिस्पर्धी सुब्रमण्यमला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, उपांत्य फेरीत त्याचा सामना चीनच्या ली फेंगशी होईल.
दुसरीकडे महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या गाओ फांगने सिंधूला 22-20, 21-13 असे नमवले. या पराभवासह सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 29 मिनिटे चाललेल्या या सामन्यात चीनच्या गाओने सुरेख ख्sाळ साकारला. विशेष म्हणजे, मागील काही महिन्यापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूला या वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही.









