वृत्तसंस्था/ टोरांटो
येथे सुरु असलेल्या कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला गटात मात्र पीव्ही सिंधूला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले.
रविवारी झालेल्या पुरुष गटातील उपांत्य लढतीत जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने जपानचा अव्वल खेळाडू व 11 व्या मानांकित केंटा निशिमोटोला 21-17, 21-14 असा पराभवाचा धक्का दिला. आता, अंतिम फेरीत त्याची लढत चीनच्या जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या ली शी फेंगशी होईल. दरम्यान, सुरुवातीला जपानच्या निशीमोटोने 4-0 अशी आघाडी घेतली होती. पण, पिछाडीवरुन लक्ष्यने पुनरागमन करत 8-8 अशी बरोबरी साधली. यानंतर पुन्हा निशिमोटोने 14-11 अशी आघाडी घेतली. पण, लक्ष्यने पुन्हा एकदा सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारत पहिला गेम 21-17 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्येही लक्ष्य व निशिमोटो यांच्यात चांगलीच चुरस पहायला मिळाली. पण, सामना जिंकण्याच्या निर्धारानेच उतरलेल्या लक्ष्यने नेटजवळ सुरेख खेळ साकारत हा गेमही 21-14 असा जिंकला व अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
सिंधू पराभूत
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पीव्ही सिंधूला उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. जपानची अव्वल खेळाडू अकाने यामागुचीने तिला 21-14, 21-15 असे नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामागुचीविरुद्ध मागील विजयाचे रेकॉर्ड चांगले असतानाही सिंधूकडून या सामन्यात अनेक चुका झाल्या, याचा तिला फटका बसला. 37 मिनिटे चाललेल्या या सामन्यात यामागुचीने वर्चस्व गाजवताना सिंधूल जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, अंतिम फेरीत तिचा सामना थायलंडच्या रेचनॉक इंटेनॉनविरुद्ध होईल.









