वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या योनेक्स पुरस्कृत सनराईज इंडिया खुल्या सुपर 750 पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा माजी विजेता लक्ष्य सेनने पहिल्याच सामन्यात दर्जेदार कामगिरी करताना आपल्या देशाच्या एच. एस. प्रणॉयला पराभवाचा धक्का दिला. महिला दुहेरीत त्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांनी आगेकूच केली तर महिला एकेरीत पीव्ही सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाल.
पुरुष एकेरीच्या मानांकनात 12 व्या स्थानावरील तर या स्पर्धेच्या मानांकनात सातव्या स्थानावरील लक्ष्य सेनने प्रणॉयचा 21-14, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळवले. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी विजयी सलामी देताना फ्रान्सच्या मार्गोट लॅम्बर्ट आणि ऍनी ट्रेन यांचे आव्हान 22-20, 17-21, 21-18 तसेच दुसऱया एका दुहेरीच्या सामन्यात एन. सिक्कीरेड्डी व श्रृती मिश्रा यांनी विजयी सलामी देताना जर्मनीच्या इफलेर आणि लोहायु यांचा 21-17, 21-19 असा पराभव केला.

पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या विद्यमान विजेत्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी स्कॉटलंडच्या ख्रिस्टोफर ग्रिम्ले आणि मॅथ्यू ग्रिम्ले यांचा 21-13 आणि 21-15 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळवले. गेल्या आठवडय़ात झालेल्या मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज आणि यांना पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात डेन्मार्कच्या रेसमूस गिमेकीने जपानच्या केंटो मोमोटाचा 21-15, 21-11, चीनच्या युक्वीने इंडोनेशियाच्या चिको वार्दोयोचा 20-22, 21-16, 21-15, चीन तैपेईच्या वेंग वेईने आयर्लंडच्या निग्युयेनचा 21-18, 21-17, चीन तैपेईच्या पाचव्या मानांकित चोयु चेनने ली ईयुचा 22-20, 14-21, 21-11, झाओ पेंगने वेंग यांगचा 21-19, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.
महिलांच्या विभागात थायलंडच्या इन्टेनॉनने मलेशियाच्या वेईचा 21-13, 21-11 तसेच रियो ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मॅरीनने 2017 साली विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणाऱया नोझोमी ओकुहाराचा 21-13, 21-18 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. याशिवाय महिला एकेरीत भारताच्या सिंधूचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. थायलंडच्या सुपनिदा केटथाँगने तिचा 21-12, 22-20 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.









