वृत्तसंस्था/ शेनझेन, चीन
भारताचा अव्वल बॅडमिंनटपटू लक्ष्य सेनने येथे झालेल्या किंग चषक आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत फ्रान्सच्या अॅलेक्स लॅनियरचा पराभव करून तिसरे स्थान मिळविले.
जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असणाऱ्या लक्ष्य सेनने तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या प्लेऑफ लढतीत जागतिक अठराव्या मानांकित लॅनियरवर 21-17, 21-11 अशी मात केली. चीनच्या जागतिक अग्रमानांकित झेअॅनकडून लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्याला तिसऱ्या स्थानासाठी प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. याआधी त्याने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या अँगस एन्ग का लाँगला पराभूत केले होते. हु झेअॅन व अँटोनसेन यांच्यात जेतेपदाची लढत होणार आहे.
किंग कप आंतरराष्ट्रीय ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही नवी स्पर्धा असून चीनच्या दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन लिन डॅनने त्याची सुरुवात केली आहे. पुरुष एकेरीत आठ खेळाडूंचा सहभाग असून या स्पर्धेतून कोणतेही रॅकिंग गुण दिले जात नाहीत. लक्ष्य हा एकमेव भारतीय या स्पर्धेत सहभागी झाला होता.









