वृत्तसंस्था/ ओडेन्सी (डेन्मार्क)
डेन्मार्क खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचे तर दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकराज रेनकीरेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरुष एकेरीच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या कोडाई नेरोकाने भारताच्या लक्ष्य सेनचा 21-17, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. जपानच्या नेरोकाने हा सामना 46 मिनिटात जिंकला. या पराभवामुळे पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताच्या एच. एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत तसेच महिला एकेरीत सायना नेहवाल यांना प्राथमिक टप्प्यातच पराभव पत्करावा लागला होता. पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताची सातवी मानांकित जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेनकीरेड्डी यांना मलेशियाच्या विद्यमान विश्वविजेत्या ऍरॉन चिया आणि सोह यिक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. चिया आणि यिक या जोडीने हा सामना 21-16, 21-19 अशा गेम्समध्ये जिंकला. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी या स्पर्धेत गुरुवारच्या सामन्यात अखिल इंग्लंड स्पर्धेतील विजेती जोडी इंडोनेशियाची मोहम्मद फिक्री आणि मौलाना यांना पराभवाचा धक्का दिला होता. पुरुष दुहेरीच्या सामन्यात मलेशियाच्या चिया आणि यिक या जोडीने 41 मिनिटे लढत देत विजय नोंदविला.









