वृत्तसंस्था / ओडेन्सी
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या डेन्मार्क खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमेंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनने तर पुरूष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरूष एकेरीच्या खेळनविण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात 21 व्या मानांकीत लक्ष्य सेनने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकीत अॅन्डर्स अॅन्टोन्सेनचा 21-13, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱ्या फेरीतील हा सामना 53 मिनिटे चालला होता. आता लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चायनाचा यांग आणि फ्रान्सचा लेनियर यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर होईल.
पुरूष दुहेरीच्या लढतीमध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी चीन तैपेईच्या हुई आणि हेसुआन यांचा 21-19, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 41 मिनिटांत पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेत पहिल्या फेरीतील सामन्यात सात्विक आणि चिराग शेट्टीने या भारतीय स्कॉडलंडच्या ख्रिस्टोफर ग्रीमेली आणि मॅथ्यु ग्रीमेली यांचा पराभव केला होता.









