देवीच्या अंगावरील दागिने लांबवले
प्रतिनिधी/ बेळगाव
मास्तमर्डी येथील श्री लक्ष्मी मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
विष्णू सिद्धाप्पा बडीगेर (वय 58) यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. विष्णू हे देवीचे पुजारी आहेत. शुक्रवार दि. 26 जुलै रोजी रात्री 10 वाजता त्यांनी मंदिराला कुलूप घातले होते. शनिवारी सकाळी 6 वा. त्यांची पत्नी झाडलोट करण्यासाठी गेली. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी मंदिराला लावलेले चार कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आहे. देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने पळविण्यात आले असून सुमारे 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने चोरल्यासंबंधी भारतीय न्यायसंहिता 305, 331(4) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.









