कराडमध्ये दीपावलीचा उत्साह द्विगुणित; कोटय़वधी रूपयांची उलाढाल
प्रतिनिधी/ कराड
कोरोनामुळे दोन वर्ष नियमांच्या चौकटीत अडकलेला दीपावली सण यंदा प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. सोमवारी कराड शहरात दीपावलीच्या उत्साहाला उधाण आले होते. बाजारपेठेत सकाळपासून खरेदीसाठी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सायंकाळी सहा नंतर फटाक्यांच्या आतषबाजीत अन् रांगोळ्यांच्या देखणेपणात लक्ष्मीपूजन मंगलमय वातावरणात साजरे झाले.
सोमवारी पहाटे नरकचतुर्थदशी व अभ्यंगस्नान होते. कराड शहरात पहाटेपासूनच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयाचा फिव्हर सोमवारीही कायम होता. शिवाय नियमांच्या चौकटीतून बाहेर पडत दोन वर्षांनी दिवाळी साजरी होत असल्याचा आनंदही होता. कराड शहरातील दैत्यनिवारणी मंदीर, कृष्णामाई मंदीर, हनुमान मंदीर, श्री साईबाबा मंदीर, स्वामी समर्थ मंदिरासह इतर मंदिरात सकाळी भाविकांची उपस्थिती होती. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर पहाटे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
दरम्यान सकाळपासून शाहू चौक, दत्त चौक, बाजारपेठ, चावडी चौक, मंगळवारपेठ, विजय दिवस चौक, कृष्णा नाक्यावर झेंडुची फुले, लक्ष्मीपूजनाचे साहित्य विक्रीचे स्टॉल लागले होते. या स्टॉलवर खरेदीसाठी दिवसभर गर्दी कायम होती. सर्व रस्ते गर्दीने आणि वाहतूक कोंडीने फुलून गेले होते. सायंकाळी बाजारपेठेसह शहरात लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली होती. व्यापारी, व्यावसायिकांसह घरांबाहेर स्वच्छता, विद्युत रोषणाई करून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. लक्ष्मीपुजनाचा गोरज सायंकाळी सहा वाजल्यापासून असल्याने या मुहूर्तावर लक्ष्मीपुजनाची लगबग सुरू होती. सायंकाळनंतर बाजारपेठेसह शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन साजरे झाले. रात्री उशिरापर्यंत शहरात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कराडसह आसपासच्या तालुक्यातून लोकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. बुधवारी पाडवा असून ग्राहकांसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. सोने चांदी, मोबाईल, इलेक्ट्रीक वस्तूंवर मोठय़ा ऑफर देण्यात आल्या आहेत.
झेंडूची फुले कुठे दीडशे तर कुठे शंभर
यंदा परतीच्या पावसाने पिकांसह झेंडूच्या फुलशेतीचेही नुकसान झाले. त्यामुळे झेंडूची आवक कमी झाली होती. परिणामी झेंडुच्या फुलांचा किलोमागे दर कुठे शंभर होता तर कुठे दराने दीडशे पार केले होते. झेंडुच्या फुलांची मागणी वाढली होती मात्र सायंकाळनंतर फुलांचा तुटवडा जाणवायला लागला. कोहळा, आंब्याचे डहाळे, फळे यासही मोठी मागणी होती.








