अभिनेते शिवराजकुमार यांची विशेष उपस्थिती : कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा शनिवारी सायंकाळी सुळेभावी-शिंदोळी भागात भव्य रोड शो झाला. या रोड शोला कन्नड हॅट्ट्रिक हिरो शिवराजकुमार यांची विशेष उपस्थिती होती. त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा एकदा निवडून आणणार, असा निर्धार या रोड शोच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी केला आहे.
कन्नड अभिनेते शिवराजकुमार, त्यांची पत्नी गीता शिवराजकुमार यांच्या हस्ते प्रारंभी सुळेभावी येथील लक्ष्मीदेवीचे पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मोठ्या जल्लोषात रोड शोला प्रारंभ करण्यात आला.
हॅट्ट्रिक हिरो शिवराजकुमार येणार असल्याने त्यांच्या चाहत्यावर्गामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. शिवराजकुमार यांना पाहण्यासाठी व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी रॅलीत दिसून आली. सुळेभावी येथे शिवराजकुमार यांनी उपस्थित सर्वांना नमस्कार करून दोन कन्नडगीते सादर करून उपस्थितांमध्ये जोश निर्माण केला. शिवराजकुमार यांनी गीत सादर केल्यानंतर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा वर्षाव केला.
देवाचा आणि सर्व जनतेचा आशीर्वाद लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर आहे. त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी होणार, असा विश्वास अभिनेते शिवराजकुमार यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामीण मतदारसंघामध्ये विविध विकासकामे राबविली आहेत. त्या निवडून आल्यानंतर या विकासकामांमध्ये अधिक भर पडणार असून ग्रामीण मतदारसंघाचा कायापालट करणार आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा लक्ष्मीआक्का हेब्बाळकर यांना मतदानाच्या स्वरुपात सर्वांनी आशीर्वाद द्या आणि निवडून आणा, असे आवाहनही शिवराजकुमार यांनी केले.
शिंदोळी गावात लक्ष्मी हेब्बाळकर व शिवराजकुमार यांच्या हस्ते क्रांतिवीर संगोळळी रायाण्णा यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शिंदोळी गावातही जोरदार रोड शो झाला. त्यानंतर होन्निहाळ गावात रोड शो झाला. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, गंगना कल्लूर, नागेश देसाई, शंकरगौडा पाटील, बसवराज मंगोटी, निलेश चंदगडकर, रजत ओळाग•ाr, महांतेश मत्तीगो आदींसह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









