महिलांची लक्षणीय उपस्थिती : हेब्बाळकरांना निवडून आणण्याचा निर्धार
बेळगाव : बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा बुधवारी मण्णूर गावात झंझावाती प्रचार करण्यात आला. हेब्बाळकर यांच्या प्रचारफेरीत काँग्रेसचे कार्यकर्ते व महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. पुन्हा एकदा लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवडून आणण्याचा निर्धार त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मण्णूर गावात हेब्बाळकर यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रारंभी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात झाली. संपूर्ण गावभर ही प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीत महिला आरती ओवाळून व पुष्पवृष्टी करून हेब्बाळकर यांचे स्वागत करीत होत्या. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांची सेवा करून त्यांना प्रशासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये काम केलेले आहे. अनेक गावांमध्ये रस्ते, पाण्याची सोय आदी विकासकामे राबविण्यात आलेली आहेत. मला पुन्हा एकदा निवडून आणा, मी या ग्रामीण मतदारक्षेत्राचा कायापालट करणार आहे. महिला व तरुणांसाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मला मतदान करा, असे आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. आपल्या ग्रामीण मतदार संघाचा हेब्बाळकर यांनी बराच विकास केलेला आहे. त्यामुळे आपण लक्ष्मीअक्का यांना पुन्हा विजयी करण्यासाठी प्रयत्न करूया, असे उपस्थित कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. प्रचारफेरीत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.









