ओटी भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी : हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
वार्ताहर /काकती
होनगा येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रा बुधवारी अभूतपूर्व उत्साहात पार पडली. देवीची ओटी भरण्यासाठी सायंकाळी 6 वा. पर्यंत सुवासिनींची एकच गर्दी झाली होती. मंगळवारी देवीला साज अलंकृत करून मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी पाटील घराण्याच्या देवघरात साखरपुड्याचे विडे काढण्यात आले. हक्कदार व गावकरी यांनी पाटील यांच्या देवघरातून सवाद्य मिरवणुकीने श्री लक्ष्मीचे मंदिरात आगमन झाले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची ओटी भरून नैवेद्य दाखविला.
शस्त्र टोचण्याचा विधी
मंगळवारी पहाटे मंदिरातून प्रमुख पुजारी महादेव बसवाणी पुजारी यांच्या घरी देवी स्थानापन्न करण्यात आली. कचेरी गल्लीतील मास्ती व मातंग मेहस्त्राr यांच्या घरी पूजाविधी व गोड नैवेद्य दाखविण्यात आला. तेथून सवाद्य मिरवणुकीने पुजारी बंधूंच्या घरी बुधवारी सकाळी 10 वा. आगमन झाले. ढगळारे यांच्यावतीने शस्त्र टोचण्याचा विधी झाला. पाटील घराण्यातर्फे गाऱ्हाणे घालण्यात आले.
गदगीसमोर धान्याची आरास मांडून पूजा विधी
दुपारी 12 च्या सुमारास देवीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला-पुरूष, युवा-युवती भाविक सहभागी झाले होते. दुपारी 1 च्या सुमारास ग्राम पंचायत समोरील गदगीजवळ आगमन झाले. गदगीवर देवी विराजमान झाली. तेथे धान्याची आरास मांडून पूजा व धार्मिक विधी करण्यात आला. गाऱ्हाण घालून मानाचा विधी झाला. बेन्नाळी येथील पाटील बंधूंना पहिला ओटी भरण्याचा मान देण्यात आला. दिवसभर सुवासिनीं, माहेरवासिंनींनी ओटी भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. रात्री उशीरा पतीर व पडली पूजा करण्यात आली. यात्रा विसर्जनाचे गाऱ्हाणे घालण्यात आले. सायंकाळी 7 वा. पासून परगांवाहून येणाऱ्या भाविकांची गर्दी महाप्रसादासाठी दाटली होती. रात्री 12 वा. पर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी होती.









