हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा सिद्ध
वृत्तसंस्था/ लक्षद्वीप
लक्षद्वीप येथील एका न्यायालयाने बुधवारी खासदार मोहम्मद फैजल यांना 2009 मधील हत्येच्या प्रयत्नासाठी नोंद गुन्हय़ाप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर न्यायालयाने फैसल तसेच अन्य तीन गुन्हेगारांचा जामीनही रद्द केला आहे. हत्येच्या प्रयत्नाचा एकूण 23 जणांवर आरोप ठेवण्यात आला होता, यातील 4 जणांना यापूर्वीच दोषी ठरविण्यात आले होते. कवारत्तीमध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. माजी केंद्रीय मंत्री पी.एम. सइंद यांचे जावई पदनाथ सालेह यांच्यावर 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सालेह यांच्यावर अनेक महिन्यांपर्यंत उपचार सुरू होते. तर शिक्षेच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार फैसल यांनी सांगितले आहे.









